पंढरपूर – महान्यूज लाईव्ह
पंढरपूरचा विठूराया हा देशविदेशातील सामान्य, बहुजनांचा आधार.. सावळ्या विठूरायाने कधीच कोणाकडे काही मागितले नाही.. ना पार्टनरशीप, ना नवसपूर्ती..! पण तरीही विठूरायाला देखील दागिने अर्पण केले जातातच. मात्र सध्या मंदीर प्रशासन समितीची डोकेदुखी बनावट दागिन्यांमुळे वाढली असून हे दागिनेही थोडे थोडके नसून चक्क पोतेभर आहेत.
देवाला दागिने अर्पण करताना खोटे दागिने अर्पण होतात ही संबंध देशातील मंदिर प्रशासनाची डोकेदुखी असतेच, सराफांनाच बोलावून दागिन्यांची शहानिशा करून दागिने वेगळे केले जातात. मात्र पंढरपूरच्या मंदिराच्या खजिन्यात पोते भरून बनावट दागिने निघाल्याने त्याची चर्चा अधिक झाली आहे.
मंदिर प्रशासन समितीने याबाबत कारण देताना भाविकांची आर्थिक परिस्थिती हे देखील कारण दिले असून सराफांकडून भाविकांची फसवणूक होते हेही त्यामागचे प्रमुख कारण दिले आहे. कारण कोणतेही असो, पांडूरंग कधीच काही मागत नाही. मग त्याला तरी खोटे का अर्पण करता? त्यापेक्षा अर्पणच करू नका ना? असा सवाल वारकऱ्यांनी केला आहे.