सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
करेवाडी येथून इंदापुरात शिकण्यासाठी येणाऱ्या शाळकरी मुलाचा काल मृत्यू झाला. प्रणव नानासाहेब करे या मुलाचा यामध्ये खून झाला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी राजकुमार पवार, इरफान शेख व फरदीन मुलाणी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रणव याच्या भावाने प्रतिक नानासाहेब करे याने इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली. काल इंदापूर पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेता सदरील तिघा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी केली आणि खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून वरील तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात प्रणवच्या भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार प्रणव याला इंदापूर शहरात येऊ नको अशी धमकी इरफान शेख व फरदीन मुलाणी आणि माढा तालुक्यातील अमोल चव्हाण यांनी दिली होती. जर तू इंदापूरला आलास, तर तुला कायमचा संपवू. रिव्हॉल्वरच्या गोळ्या घालून ठार मारू अशी देखील धमकी दिली होती.
3 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रणव याचा भाऊ तिघांना भेटला आणि त्यांनी शिवीगाळ करू नका अशी विनंती केली, मात्र त्यानंतरही तिघेजण प्रणव यास मारणार असल्याचे सांगत होते. 4 जानेवारी रोजी राजकुमार पवार याने तुझ्या भावाला आम्ही आज मारणार आहोत असा फोन केला. त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रणव याचा सातपुते वस्तीत अपघात झाल्याचा फोन आला. तेथे जाऊन पाहिले असता गाडी पडलेली होती. तिथे राजकुमार पवार व त्याचे मित्र होते. प्रणव यास दवाखान्यात उपचारासाठी नेले असल्याचे राजकुमार पवार याने सांगितले, मात्र डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.
त्यामुळे प्रणव यास इंदापुरातील राजकुमार पवार, वडापुरी येथील फरदीन मुलांनी व इरफान शेख यांनी पाठलाग करून जुन्या भांडणाच्या कारणावरून कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून जिवे मारले आहे अशी फिर्याद प्रणव याच्या भावाने दिली. त्यावरून इंदापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास फौजदार दाजी देठे करत आहेत.