मुंबई – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदला मारण्याची भाषा करणाऱ्या तिला लवकर अटक करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे यांनी जबरदस्त टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट करीत चित्रा वाघ यांना आरसा दाखवला आहे. त्या म्हणतात, जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच आक्षेप असतील, तर असेच आक्षेप कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेषभूषेवर तुम्ही घेणार का? किंवा त्यांना म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार व भाषेत जास्त असतो. प्रसिध्दीझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडून किती भरकटत जाल? असा निशाणा अंधारे यांनी साधला.
अंधारे यांनी कंगणा राणावत, अमृता फडणवीस, केतकी चितळे यांचे तोकडे कपड्यातील फोटो पोस्ट करून सत्तेचा माज या कॅप्शनखाली हा निशाणा साधला आहे. यामध्ये अंधारे म्हणतात, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच… अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना ) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकटत जाल.