सासवड – महान्यूज लाईव्ह
अलिकडच्या काळात तरुण पोरांना एवढी कशाची घाई झालेली असते कोणास ठाऊक? १०० सीसी वरून आता अगदी ३५० सीसी पर्यंत क्षमता वाढवलेल्या दुचाक्यांना ते दामटत अत्यंत वेगाने जात असतात.. मात्र हा वेग त्यांच्यापेक्षा इतरांसाठीच जीवघेणा ठरतो. पुरंदर तालुक्यातील दिवे येथे घडलेली ही घटना दोघांना आयु्ष्यातून उठवणारी ठरली.
नातवाला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या आजोबा व नातूचा शाळेचा तो दिवस अखेरचा दिवस ठरला. पुणे पंढरपूर महामार्गावर दिवे गावानजिक हडपसर बाजूने आलेल्या भरधाव दुचाकीने अशी धडक दिली की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त जमावाने दुचाकी पेटवून दिली. या घटनेत गोकुळ कोंडिबा झेंडे (वय ६२ वर्षे) व त्यांचा नातू पद्मनाभ झेंडे (वय १० वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला.
अगदी घर जवळ आले असतानाच हा अपघात झाला. घरासमोरच अपघात झाल्याने काही क्षणातच तेथे गर्दी जमली. त्या गर्दीने दुचाकी पेटवून दिली. मात्र या घटनेत निष्पाप आजोबा व नातूचा मृत्यू झाल्यानंतर दिवे परिसरात शोककळा पसरली.