बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित होणाऱ्या कृषिक प्रदर्शनात दरवर्षी सतत नाविण्यपूर्ण शेती तंत्रज्ञान पाहायला मिळते. यावर्षीच्या कृषिक प्रदर्शनात जे काही नाविण्यपूर्ण आहे, त्यात डच बास्केट लक्ष वेधून घेतेय.. फक्त क्लेबॉलवर चक्क २०-२० फूट उंचीपर्यंत टोमॅटो वाढलाय.. फक्त वाढला नाही, त्याला निर्यातक्षम एकदम भारी चेरी टोमॅटो लगडले आहेत.. एवढेच नाही, तर आतापर्यंत मातीविना शेतीत हायड्रोपोनिक्सचे तंत्र सर्वांनी पाहिले, आता सूर्याच्या प्रकाशसंश्लेषणाची गरज अंधारातही, घरातही फोटोसिन्थॅसिस ट्यूबलाईटद्वारे भरून काढली जाणार आहे.
व्हर्टीकल व्हेजिटेबल्स ही संकल्पना या कृषीक प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. थराची शेती, परंतू वेगवेगळ्या पध्दतीने, म्हणजे अत्यंत कमी जागेत चार-पाच किंवा अगदी मशरूम निर्मितीसारखे दहा-दहा मजली भाजीपाल्याच्या हायड्रोपोनिक्स तंत्राच्या प्लेटस पाहायला मिळतील, ज्याद्वारे भविष्यात अल्पभूधारक, क्षारपड जमीनी असलेल्या ठिकाणी तसेच शहरी भागात गच्चीवर भाजीपाल्याचे अधिकतम उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनादरम्यान हे नवे तंत्र राज्यभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कृषिक प्रदर्शनात त्यांनी जिवंत शेतीची प्रात्यक्षिके सुरू करण्याचा ध्यास घेतला आणि आज राज्यात तो लोकप्रिय झाला आहे.
जे प्रत्यक्षात उत्पादित होताना पाहायला मिळते, तेच शेतकऱ्यांना भावते ही संकल्पना मनात घेऊन राजेंद्र पवार यांनी कृषिक प्रदर्शन सुरू केले. आज ते आर्टिफिशीयल इंटेलिजन्स पर्यंत पोचले आहे.
मातीविना शेतीचा नवा प्रयोग, हवेतील शेती, होमिओपॅथीचा वापर करून उत्तम अधिक उत्पादनाची शेती असे अनेकविध प्रयोगानंतर हा आता नवीन टप्पा असणार आहे. त्यामुळे राज्यभरातील बळीराजाला शेतीची भविष्यातील संकल्पना अधिक सहजपणे समजण्यास मदत होणार आहे.