ग्रामपंचायतीमध्ये श्रीमंत ढोले यांचाच आवाज… लाखेवाडीत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या लाखेवाडी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी चित्रलेखा श्रीमंत ढोले या निवडून आल्यानंतर प्रशासनाकडून उपसरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आमचाच उपसरपंच होणार अशी विरोधी गटाकडून प्रचंड प्रमाणात चर्चा झाली.. मात्र विरोधकांची हवा गुल होवून ‘फुसका बारच’ ठरला. अखेर उपसरपंचपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच सदस्याच्या गळ्यात पडली.
उपसरपंच निवडणूक प्रक्रिया लाखेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच चित्रलेखा श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व निवडणूक निरीक्षक म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, ग्रामसेवक गणेश खरमाटे यांनी कामकाज पाहिले..
उपसरपंच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाने राजेंद्र जगन्नाथ भोसले यांनी उपसरपंच पदाची निवडणूक जिंकली.यामुळे ग्रामपंचायत लाखेवाडी वर सरपंच व उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व झाले.
उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची निवड होताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला. गुलालाची प्रचंड प्रमाणात उधळण करत हलगीच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.