दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील मांढरदेव यात्रा अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी श्री काळुबाई मंदिर व मांढरदेव परिसराची पहाणी केली.
मांढरदेव यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा सूचना न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संयुक्तपणे केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे, तहसीलदार रणजित भोसले, वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, वाई नगरपालिका मुख्याधिकारी किरण मोरे, बांधकाम उपअभियंता जाधव, वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या विविध विभागांनी केलेली तयारी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तयारीबाबत समाधान व्यक्त केले व कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा कालावधीदरम्यान दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या .