औरंगाबाद – महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिल्लोड तालुक्यातील तेलगाव येथे रवींद्र काजळे या तरूणाचा मान कापलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यावरून त्याचा मृत्यू हा बिबट्याने हल्ला केल्याने झाल्याची चर्चा झाली. मात्र शवविच्छेदनादरम्यान अनेक बाबी संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी तपास केला आणि हल्लेखोर बिबट्या गावातलाच निघाला..
रवींद्र काजळे व त्याचा मोठा भाऊ एक जानेवारी रोजी शेतात गेले होते. संध्याकाळी पार्टी करायचे दोघांनी ठरवले होते. त्यासाठी रवींद्र हा अगोदर शेतात पोचला. काही वेळाने रवींद्रचा भाऊ व त्याचे मित्र शेताकडे निघाले. मात्र शेताजवळ पोचताच त्यांना रवींद्र याचा मान कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने घबराट पसरली.
रवींद्र याचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला व बिबट्यानेच हल्ला केला अशी चर्चा गावात सुरू झाली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही तेथे भेट दिली. मात्र दूर दूर अंतरावरही बिबट्याचे निशाण आढळले नाही, तसेच एकूणच प्रकार थोडा विचित्र वाटत होता.
जेव्हा त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले, तेव्हा हा बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर नियोजनबध्द धारदार शस्त्राने केलेला खून असल्याचे समोर आले. प्रथमदर्शनी संशय आल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि पोलिसांची संशयाची सुई गणेश कैलास चव्हाण याच्यावर सरकली.
चव्हाण यास चौकशीसाठी ताब्यात घेताच त्याने पोलिसांना खूनाची कबुली दिली. आपल्या बायकोला हा शिट्ट्या मारतो, सतत गल्लीतून येता जाता शिट्ट्या मारतो म्हणून समजावले, तर तुला काय करायचे ते कर असे गुर्मीत तो बोलला, त्यामुळे चिडून जाऊन त्याचा खून केला अशी कबुली गणेश चव्हाण याने दिली.