मुंबई – महान्यूज लाईव्ह
जामतारा हे अख्खंच्या अख्खं गाव फसवणूकीसाठी प्रसिध्द आहे. मुंबई, पुण्यात ओएलएक्स फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास करताना सायबर पोलिसांनी राजस्थानातील अख्खं गावच यात असल्याचं समोर आणलं. त्यातही या टोळीत अवघ्या १२ वर्षांचा पोरगा आहे, जो या टोळीचा हुकुमी एक्का आहे..आणि त्याने एकट्यानेच कोट्यवधींचा गंडा महाराष्ट्रासह १९ राज्यात घातल्याचे समोर आले आहे.
राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील चौराह हे गाव सध्या देशात नव्याने चर्चेत आले आहे. कारण गावातील ७०० पेक्षा अधिक जण ओएलएक्स वरून होणाऱ्या फसवणूकीचे साथीदार आहेत, तर या टोळीचा म्होरक्या समशू उर्फ सर्वसुख खुट्टा हा आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गन्हे आहेत. पोलिसांनी या टोळीतील महत्वाची तीन भावंडं, जी फरार आहेत, त्यांचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. यामध्येच एक १२ वर्षाचा अल्पवयीन गुन्हेगार आहे, जो या टोळीचा आत्मा आहे. या पोराने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीमुळे अल्पावधीतच तो या गावात लोकप्रिय झाला आहे.
ओएलएक्स वरून फसवणूक करणारी टोळी देशात सक्रीय झाली असून सायबर पोलिसांची ती मोठी डोकेदुखी ठरली आहे. दहावी, बारावीच्या पोरांना बरोबर घेऊन ओएलएक्सवरून ही टोळी फसवणूक करीत असून रात्री ९ नंतर फसवणूकीचा कार्यक्रम सुरू होतो आणि प्रत्येकवेळी नवे सीमकार्ड घेऊन ही मंडळी फसवणूक करत असल्याने सायबर गुन्हेगारी शोधणाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे.