पुणे : महान्यूज लाईव्ह
तीन दिवसांपूर्वी हातात कोयता घेऊन दिसेल त्या दुकानात जाऊन दहशत माजवणारा गुंड आज मात्र पोलिसांनी हातकड्या घालून त्याच बाजारपेठेतून फिरवला, तेव्हा तीन दिवसांपूर्वी ज्याची दहशत लोकांनी घेतली होती, त्यालाच लोक कुत्सितपणे पाहून हसत होते.
पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे रात्रीच्या वेळी अचानक कोयता घेऊन उघड्या असणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन दहशत वाजवणारा गुंड पाहून लोक सैरावैरा धावत होते. त्याचवेळी तिथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे धनंजय पाटील व अक्षय इंगवले अत्यंत तत्परतेने पोचले आणि त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखून या गुंडाला बेदम चोप दिला. हातात कोयता घेऊन दिसेल त्या वस्तूंची, गाड्यांची, दुकानांची तोडफोड करत सुटलेल्या या गुंडाचा पोलिसांनी रुद्रावतार धारण करतात साराच आत्मविश्वास गळाला आणि सॉरी म्हणायला सुद्धा जागा ठेवली नाही. पोलिसांनी याला धू धू धुतले.
धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले यांच्या या कामगिरीबद्दल पुणेकरांनी त्यांचं कौतुक केलं यातील मुख्य आरोपी करण दळवी हा बीडमध्ये पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्याचा शोध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी घेत होते पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे यांना आरोपीकरण दळवी हा बीडमध्ये लपून बसल्याचे माहितगार सूत्रांकडून समजले.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी फौजदार धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे सचिन गाडे यांना तेथे रवाना केले आणि या तपास पथकाने करण अर्जुन दळवी (रा. माणिकबाग सिंहगड रोड पुणे) याला ताब्यात घेतले.
काल हातकड्या घातलेला गुंड पाहून लोकही पोलिसांना अभिवादन करत होते. त्याचबरोबर पोलिसांना धन्यवाद देत होते. अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था राखली, तर आम्हाला कोणत्याच गुंडाची भीती वाटणार नाही असा आशावादही पुणेकर व्यक्त करत होते.