घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह धर्मगाथा विशेष मालिका
काही वर्षापूर्वी एक बातमी वाचनात आली होती. मुलींना कसे पटवायचे यासाठी रितसर एक प्रशिक्षण वर्ग आयोजित केला गेला होता. हा प्रशिक्षण वर्ग फक्त पारशी तरुणांसाठी होता आणि याचे आयोजकही पारशी धर्माशी संबंधितच होते. या प्रशिक्षणाचा उपयोग पारशी तरुणांनी फक्त पारशी मुलींना आपलेसे करण्यासाठी करावा अशी या आयोजकांची अपेक्षा होती. वरवर वाचणाऱ्याला हे सगळे फार गंमतशीर वाटत असले तरी यामागची कारणे मात्र फार गंभीर होती.
आज ६ अब्जाची लोकसंख्या असलेल्या या जगात पारशी धर्माचे अवघे १ ते २ लाख लोख शिल्लक राहिले आहेत. ही आकडेवारीदेखील २०११ मधील आहे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे पारशी धर्माच्या अनुयायांची संख्या सतत कमी होत आहे. एकेकाळी जगातील एका मोठ्या भुभागावर ज्यांची सत्ता चालत होती, ते पारशी पुढच्या शतकात अस्तित्वात तरी राहतील का? याची चिंता या धर्माच्या धुरीणांना सतावते आहे.
पारशी धर्मनियम अतीशय कडक आहेत. दुसऱ्या धर्मातील कोणालाही या धर्मात प्रवेश करता येत नाही. अलिकडच्या काळात अशा धर्मांतराला परवानगी देण्याबाबत काही प्रयत्न झाले असले तरी त्याला सर्वमान्यता नाही. पारशी धर्माला आंतरधर्मीय लग्ने अजिबात मान्य नाहीत. ज्या पारशी मुली आपला धर्म सोडून इतर धर्मातील मुलांशी लग्न करतात, त्यांना त्यांचा मुळ धर्म सोडावा लागतो. या धर्मातील तरुण आणि तरुणींमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण खुप जास्त आहे, आर्थिक सुबत्ता ही खुप आहे, याचा परिणाम म्हणजे घटस्फोटाचे प्रमाण खुप आहे. पारशी तरुण तरुणींसाठी आपले करियर जास्त महत्वाचे असते, त्यामुळे लग्न न करण्याकडे किंवा उशीरा करण्याकडे कल असतो. मुले जन्माला घालण्याबाबतही उदासिनता आढळते. या सगळ्याचा परिणाम म्हणून या धर्माचे अनुयायी सतत कमी होत आहेत.
जगात जे लाख दोन लाख पारशी उरलेले आहेत, त्यातील २०११ च्या जनगणनेनुसार ५७२६४ पारशी भारतात होते. ज्या वेगाने या धर्माचे लोक कमी होत चालले आहे, त्यानूसार आज म्हणजे २०२२ मध्ये अवघे वीस ते बावीस हजार पारशी भारतात शिल्लक असावेत असे मानले जाते.
या धर्माचे अनुयायी भारतात कसे आले ते आपण मागच्या भागात पाहिले. आता भारतात त्यांनी आपले कसे बस्तान बसवले ते आज आपण पाहूया. गुजरातच्या किनाऱ्यावर आलेल्या आलेल्या पारशांच्या जहाजाला संजानच्या राजाने आपल्या राज्यात आश्रय दिला, तो काही अटींवर. या लोकांनी आपल्याकडील सगळी शस्त्रे राजाकडे जमा करावीत. यांनी राज्यातील गुजराती लोकांप्रमाणेच वेश परिधान करावा. गुजराती भाषा शिकावी आणि या भाषेतच बोलावे. आपल्या पारशी धर्माप्रमाणे त्यांनी आचरण करावे पण सर्व धर्मकृत्ये त्यांनी रात्री अंधार पडल्यानंतर करावी. या सगळ्या अटी या लोकांनी स्विकारल्या आणि खरोखरच दुधात साखर मिसळावी तसे हे लोक भारतीय समाजात मिसळून गेले. पण असे असले तरी पारशी म्हणून त्यांनी आपले अस्तित्व मात्र राखले. यानंतर ज्यावेळी ब्रिटीशांच्या अधिपत्त्याखाली मुंबई बेट उभे राहिले, त्यावेळी हळूहळू बऱ्याचश्या पारशांनी मुंबई बेटावर जाण्यास सुरुवात केले. ब्रिटीश आणि पारशी लोकांची येथूनच जवळीक सुरु झाली. यानंतरच्या मुंबईच्या विकासात पारशी समाजाचा फार मोठा सहभाग राहिला आहे. एकेकाळच्या मुंबईत पारशांची वस्ती ऐवढी मोठी होती की येथे मुस्लीम आणि पारशांमध्ये अनेक दंगली झालेल्या आहेत.
टाटा, बिर्ला, वाडिया, मिस्त्री, पुनावाला, पेटीट, कोवासजी, भाभा, पटेल अशा भारताच्या विकासात योगदान दिलेल्या पारशी कुटुंबाची मोठी नामावली आहे. या समाज संख्येने खुप छोटा असला तरी त्यांचे भारताच्या विकासात मोठे योगदान आहे. भारतात वैज्ञानिक शोधांचा पाया घालणारे शास्त्रज्ञ होमी भाभा, उद्योगपती जमशेटजी टाटा आणि जे. आर.डी. टाटा, फिल्डमार्शन सॅम माणकेशा ही यातील काही नावे आहेत. इंदिरा गांधीचे पती फिरोज गांधी हेदेखील पारशीच होते.
आपले सगळे घरदार टाकून भारतात आलेल्या या समाजाचे आज येथे प्रचंड मोठे आर्थिक साम्राज्य आहे. टाटा, बिर्ला, वाडिया या पारशी कुटुबांच्या हातात देशातील प्रमुख उद्योगसमुह आहेत. पारशी हे मुळातच मेहनती लोक. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही मजल मारली आहे. परंतू त्यांच्या आर्थिक उन्नतीला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे अफुचा व्यापार. ब्रिटीश आणि चीन यांच्यामध्ये अफूच्या व्यापारावरून दोन मोठी युद्ध झाली होती. त्यावेळच्या चीनच्या राजाने चीनमध्ये अफुचा व्यापार करण्यास बंदी केली होती. यावरून हे युद्ध झाले, यामध्ये चीनच्या राजाला हार पत्करावी लागली होती. त्याला हा अफुचा व्यापार पुन्हा सुरु करावा लागला होता. आता या अफुच्या व्यापाराशी पारशी लोकांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर चीनमध्ये ही अफू ही भारतातून पाठविली जात असे आणि हा भारतात ही अफू गोळा करून ब्रिटीशांना देण्याच्या कामात पारशी व्यापारी मोठ्या प्रमाणात होते. या व्यापारातून पारशी समाजातील लोकांकडे प्रचंड प्रमाणात पैसा आला. १८३० मध्ये चीनमध्ये ४२ विदेशी व्यापारी अफुचा व्यापार करत होते, त्यापैकी २० जण पारशी होते. १९०७ मध्ये अफूचे जागतिक उत्पादन ४१६२४ टन होते. ते प्रामुख्याने या पारशी व्यापाऱ्यांच्या हातात होते. या अफुमुळे चीनच्या तरुणांमध्ये व्यसनाधीनता प्रचंड वाढून चीनला सामाजिक दृष्ट्या मोठे नुकसान सोसावे लागत होते. परंतू याच व्यापाराने पारशी लोकांना प्रचंड पैसा मिळवून दिला. अर्थातच पुढील काळात अफूचा व्यापार कमी होत गेला आणि पारशी समाजही या व्यापारातून बाहेर पडला. पण या व्यापारातून मिळविलेला पैसा त्यांनी अनेक मोठेमोठे उद्योग उभारण्यात लावला. त्यातून भारतातील औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज देशामध्ये अनेक नामवंत शिक्षणसंस्था आहे, ज्या पारशी लोकांनी उभारलेल्या आहेत. त्यामध्ये जे जे स्कुल ऑफ आर्टस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनेस, बंगलोर, सर जे जे स्कुल ऑफ आर्किटेक्चर, बी जे मेडिकल कॉलेज, जेजे मेडिकल कॉलेज, जे. एन पेटिट लायब्ररी आणि सेठ आर जे जे हायस्कुल यासारख्या संस्थांचा समावेश आहे.
ज्यांनी पाकिस्तानची स्थापना केली ते महंमह अली जीना यांना भारतात तिरस्काराची वागणूक मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की या जीनांचे वंशज सध्या भारतातच राहतात आणि त्यांचा संबंध भारतातील एक अग्रगण्य उद्योगसमूहाशी आहे. जीनांनी एका पारशी मुलीशी लग्न केले होते. या लग्नातून त्यांना एक मुलगी झाली होती. ही मुलगी हीच जीनांची एकमेव वारसदार. या मुलीने ज्यावेळी लग्न करायचे ठरवले त्यावेळी भारतातील वाडिया या उद्योगसमुहातील एका पारशी मुलाची निवड केली. जीनांना हे अजिबात पसंत पडले नाही. जगात इतके मुसलमान आहेत, त्यातला एकही मुलगा तुला पसंत पडला नाही का, एक पारशीच का पाहिजे असे त्यांनी तिला त्यावेळी विचारले होते. त्यावेळी दिना या त्यांच्या मुलीने त्यांना उत्तर दिले की तुम्ही लग्न केले तेव्हाही जगात असंख्य मुस्लिम मुली होत्या, पण तुम्ही पारशी असलेल्या माझ्या आईशी का लग्न केले. यावर जीना म्हणाले की, ती मुस्लीम होण्यास तयार होती. अर्थातच या युक्तीवादाचा काहीही परिणाम दिना यांच्यावर झाला नाही. वडिलांच्या विरोधाला डावलून तिने लग्न केले. लग्नानंतर तीने पारशी धर्माचा स्विकार केला. वाडिया उद्योगसमुहाला मोठ्या उंचीवर देणारे नस्ली वाडिया हे या दिना वाडियांचे पुत्र आहेत. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मुंबईतील एक घर असे होते, जिथे एकाच वेळी भारत आणि पाकिस्तानचा झेंडा फडकत होता. हे घर जीनांची मुलगी दिना वाडिया यांचे होते.
आज पारशी समाज एका वळणावर उभा आहे. एकीकडे प्रचंड आर्थिक संप्पती, उच्चशिक्षित, बुद्धिमान लोकसंख्या आणि दुसरीकडे आजवर प्राणपणाने जपलेला आपला धर्म सतत घटत्या लोकसंख्येमुळे नष्ट होण्याची भीती. यातून कसा मार्ग काढावा याचीच चिंता या समाजाला आता भेडसावते आहे.
यातून एक आशेचा किरण डोकावला आहे, तो इराकमधील कुर्दिस्थानामध्ये. तेथे अनेक मुस्लिम पारशी धर्मात आले आहेत. तिथल्या कुर्दिश सरकारने त्यांना मान्यताही दिली आहे. तिथे नव्यानेच एक पारशी अग्यारी उभारण्यात आलेली आहे. तिथे अंदाजे १५००० पारशी असावेत असा अंदाज आहे. यातून कदाचित पु्न्हा एकदा पारशी धर्म नव्याने उमलू लागण्याची शक्यता आहे.
तर होता पारशी धर्माचा इतिहास आणि प्रवास . हा लेख कसा वाटला नक्की कळवा.