पुणे : महान्यूज लाईव्ह
भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घकालीन आजाराने आज बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
पिंपरी चिंचवडच्या शहरात राजकारणात धबधबा असलेले लक्ष्मण जगताप हे गेले 35 वर्ष शहराच्या विविध जडणघडणीत सक्रिय होते. ते चार वेळा नगरसेवक व चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. लक्ष्मण जगताप या नावाचा दबदबा पिंपरी चिंचवड महापालिकेतही सातत्याने राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला होता.
अपक्ष म्हणून त्यांनी गाजवलेली कारकीर्द देखील राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिली. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे मातब्बर नेते चंदूकाका जगताप यांचा त्यांनी केलेला पराभव, तसेच शिवसेनेचे तत्कालीन आमदार श्रीरंग बारणे यांचा केलेला पराभव देखील अनेकांना आजही स्मरणात आहे.
एकेकाळचे अजित पवार यांचे जवळचे सहकारी अशी त्यांची ओळख होती. सन 2017 मध्ये भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात करण्यात लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. जगताप गेली दोन वर्ष आजारी होते त्यांनी अमेरिकेतील उपचार घेतले मध्यंतरीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान आजारी असतानाही ते मुंबईत मतदानासाठी आले होते. जगताप यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी अश्विनी, कन्या ऐश्वर्या, बंधू शंकर जगताप व विजय जगताप असा परिवार आहे.