घनशाम केळकर – महान्यूज लाईव्ह
राजगड पोलिस ठाणे हे भोर तालुक्यातील पुणे व सातारा जिल्ह्याशी दुवा साधणारे.. या पोलिस ठाण्यावर तसाही कायदा व सुव्यवस्थेचा ताण असतोच.. सन २०१४ मध्ये एका वर्षात सर्वाधिक ७ खु-नाच्या घटना या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. प्राणघातक हल्ल्याच्या घटनाही येथे सातत्याने घडतात. सर्वाधिक घटना मात्र अपघाताच्या असतात.. यावर्षी एक घटना अत्यंत महत्वाची ठरली आहे.. माणसाने माणसाचा जीव घेण्याची घटना या संपलेल्या वर्षात घडलेली नाही आणि हीच गुड न्यूज आहे.
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१३ मध्ये १, २०१४ मध्ये ७, २०१५ मध्ये २, २०१६ मध्ये २, २०१७ मध्ये ६, सन २०१८ मध्ये ३, सन २०१९ मध्ये ५, कोरोनाच्या काळात सन २०२० मध्येही ४ खु-नाच्या घटना घडल्या. सन २०२१ मध्ये १ घटना घडली. मात्र सन २०२२ मध्ये एकही घटना घडली नाही.
पोलिसांनी समोरासमोर दोन्ही पक्षांना बसवून अनेक तंटे मिटवल्यानेही वादविवाद तसेच गंभीर घटना टाळण्यात यश आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याच्याच जोडीला माणसांनी माणसांच्या माणूसकीलाही महत्व दिल्याचेच यातून प्रतित होताना दिसते.
भोर तालुक्याला इतिहासाची उज्वल परंपरा आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणूसकी सुधारली असेल, तर निश्चितच त्याचे स्वागत करायला हवे. कारण एरवी सन २०२० मध्ये प्राणघातक हल्ल्याच्या १० घटना, सन २०२१ मध्ये ४ घटना घडल्या, तर सन २०२२ मध्ये त्या घटना ३ घडल्या आहेत.