पुणे – महान्यूज लाईव्ह
येरवडा जेलमध्ये तीन कैद्यांचा अकस्मात मृत्यू झाला. यामध्ये बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय ३२ वर्षे, रा. मोरगाव, ता. बारामती), संदेश अनिल गोंडेकर (वय २६, रा. डोणजे, हवेली) व शाहरूख बाबू शेख (वय २९ वर्षे रा. कोंढवा) या तिघांचा समावेश आहे. या तीनही कैद्यांचा मृत्यू हा वेगवेगळ्या आजारामुळे झाल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान या कैद्यांच्या अचानक मृत्यूच्या बातमीने पुणे हादरले. पाठोपाठ नातेवाईकांच्या आक्रोशाने प्रशासनही हादरले. कारागृह प्रशासनाने यासंदर्भात आक्षेप नोंदवल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट केले. दुसरीकडे येरवडा कारागृहाबाहेर कैद्यांच्या नातेवाईकांना प्रशासनाचा निषेध केला.
संदेश गोंडेकर याला सन २०१८ मध्ये खूनाच्या गुन्ह्याखाली अटक केली, तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. त्याचे आईवडील ३१ डिसेंबर रोजी भेटण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांना संदेश याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान संदेश याचा मृत्यू आंत्रविकाराने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
संदेश याला ससून रुग्णालयात उपचार दिले जात होते. त्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. संदेश गोंडेकर याच्या मृत्यूविषयी साशंकता असल्याने नातेवाईकांनी कारागृह प्रशासनावर आक्षेप घेतला होता.
मोरगाव येथील दाताळ व शेख या दोघांनाही वेगवेगळ्या आजाराने ग्रासले होते, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र तीन कैद्यांच्या मृत्यूने येरवडा चर्चेत आले आहे.
दरम्यान दुसरीकडे कैद्यांना योग्य सुविधा मिळत नसल्यानेच कैद्यांचा मृत्यू होत असल्याचा आरोप कैद्यांच्या नातेवाईकांनी व आंदोलकांनी केला. कैद्यांना २ हजार रुपये पाठवले, तर त्यांच्यासाठी नीट ५०० रुपयेही खर्च होत नाहीत अशी स्थिती असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. या आंदोलकांमध्ये आशाबी शेख, तेजस कोडीतकर, मारुती कंक यांच्यासह इतरांचा समावेश होता. दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांनी या आंदोलकांपैकी निवडक पदाधिकाऱ्यांना कारागृहात नेऊन परिस्थिती दाखवली.