दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार केल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, लिंब (ता. सातारा) येथील शेरी येथील लहान बाळाचा वाढदिवस साजरा करून सावंत हे येत होते. विठेबंदीविहीर नावाच्या मळ्यातील रस्त्यावर ते पोचले असता त्यांच्या मागावर असलेल्या संशयित हल्लेखोर युवकांनी सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर काही कळायच्या आतच कोयत्याने दोन ते तीन वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
हल्लेखोरांनी जितेंद्र सावंत यांच्यावर कोणत्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला याचे कारण अद्याप समजलेले नाही. या हल्ल्यानंतर हल्लेखोर युवक पसार झाले असून पोलीस त्यांचा मागावर आहेत. सावंत यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जितेंद्र सावंत यांच्यावरीस हल्ला प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला व तातडीने हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली.