घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष मालिका ‘ धर्मगाथा ‘
नमस्कार मित्रांनो, महान्यूज लाईव्हच्या या भागात आपण ओळख करून घेणार आहोत, जगातून जवळपास संपत आलेल्या एका धर्माची. एकेकाळी या धर्माच्या अनुयायांचे एक सामर्थ्यशाली साम्राज्य जगात होते. पण काळाच्या ओघात ते नामषेश झाले. आजच्या काळात या धर्माचे अनुयायी फार थोड्या संख्येने उरलेले आहेत, आणि त्यातील बहुतांशी भारतात राहतात. भारताच्या विकासात या धर्माच्या अनुयायांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. हा धर्म म्हणजे पारशी धर्म.
हा जगातील प्राचीन धर्मापैकी हा एक धर्म आहे. आजच्या इराणमध्ये या धर्माचा उगम झाला. पारशी हे अग्नीपुजक लोक आहेत. इसवीसनापूर्वी ५५२ वर्षी म्हणजे २५०० वर्षापूर्वी पारशी लोकांचा एक थोर राजा होऊन गेला, त्याने पहिले पारशी लोकांचे साम्राज्य स्थापन केले. या राजाचे नाव म्हणजे सायरस. आज सायरस दि ग्रेट या नावाने सगळे जग त्याला ओळखते. त्या काळी अफगाणिस्थानच्या पलिकडील सर्व आशिया या साम्राज्याअंतर्गत होता. पण हा राजा एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. दुसऱ्या धर्माचा आदर करण्याचे जे काम या राजाने केले, त्यामुळे या राजाचे नाव ज्यू धर्मियांच्या बायबलमध्ये मोठ्या आदराने घेतले गेले आहे.
सायरसच्या काळात बॉबिलॉन म्हणजे आजच्या इराकमध्ये एक मोठे साम्राज्य होते. या सम्राटाने जेरुशलेमवर हल्ला करून ते जिंकून घेतले. जेरुशलेम हे ज्यू धर्मियांचे प्रमुख स्थान. येथेच त्यांचे मंदिरही होते. या सम्राटाने हे मंदिर तोडून टाकले. सगळ्या हजारो, लाखो ज्यू लोकांना त्याने कैद करून बॉबिलॉनला नेले. तिथे अनेक वर्षे हे ज्यू लोक कैदेत खितपत पडले होते. परंतू सायरसने या बॉबिलॉनच्या राजाचा पराभव करून तिथे आपले राज्य स्थापन केले. त्यावेळी त्याने या सगळ्या ज्यूंना कैदेतून मुक्त केले. त्यांना परत जेरुशलेमला जाण्यासाठी परवानगी दिली. त्यांचे उध्वस्त झालेले मंदिर उभारण्यासाठीही त्याने मदत केली. खरेतर ज्यू धर्माच्या बाबतीत मोठे कडवे. आपण देवाने निवडलेले लोक आहोत असा त्यांना मोठा अभिमान. यामुळेच परधर्मातील कोणाबद्दलही ते फारसा आदर बाळगत नाहीत. याला अपवाद सायरस दी ग्रेट. या सायरसचा उल्लेख बायबलमध्ये मोठ्या आदराने केला जातो. एका पारशाने त्यावेळी ज्यू धर्माच्या पुर्नस्थापनेसाठी मोठा हातभार लावलेला आहे. परधर्मसहिष्णूतेचे हे अडीच हजार वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आहे.
जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर द ग्रेटचे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकले असेल. ग्रीकहून निघालेला हा अलेक्झांडर भारताच्या सीमेवर येऊन पोचला होता. परंतू या अलेक्झांडरशी पहिला सामना केला तो पारशी लोकांनी. मात्र अलेक्झांडरने या पारशी सम्राटाचा दोनवेळा मोठा पराभव केला आणि पारशांचे साम्राज्य आपल्या राज्याला जोडून घेतले. अर्थातच यावेळी सायरस दी ग्रेटचा मृत्यू होऊन २०० वर्षे लोटलेली होती. अलेक्झांडरचे साम्राज्य फार थोडे काळ टिकले. त्यांनतर पारशी लोकांनी पुन्हा आपले राज्य स्थापन केले.
इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत जवळपास ४०० वर्षे जगात दोन मोठ्या साम्राज्यांनी आपले वर्चस्व ठेवलेले होते. ख्रिश्चन धर्मीय बांझेंटियन साम्राज्य आणि पारशी धर्माचे सासेनियन साम्राज्य ही दोन मोठी साम्राज्ये होती. मात्र सहाव्या शतकात उदयास आलेल्या इस्लामच्या झंझावाताने या दोन्ही साम्राज्यांना मोठा धक्का दिला. या झंझावातात पारशी धर्माचे केवळ साम्राज्यच संपुष्टात आले नाही, तर पारशी धर्मही मोठ्या संकटात आला.
इस्लामच्या आक्रमणापुढे पारशी साम्राज्य तर कोसळलेच पण त्यांचा धर्मही ज्या वेगाने नष्ट झाला ती आजही एक आश्चर्याची गोष्ट मानली जातो. लाखांच्या घरात असलेल्या पारशी धर्मातील लोकांनी इस्लाम स्विकारला तेदेखील अवघ्या काही वर्षात. आज इराणमध्ये दाखवायलादेखील एकही पारशी उरलेला नाही. ज्या काही जणांनी इस्लाम स्विकारण्याचे नाकारले, त्यांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. अशाच काही पारशी धर्मियांनी मग भारताचा रस्ता धरला. त्यावेळच्या पर्शिया आणि आजच्या इराणमधून पारशी लोकांचा पहिला छोटासा जथ्था जहाजातून सर्वप्रथम गुजराथच्या किनाऱ्यावर आला.
भारताच्या किनाऱ्यावर आलेल्या या लोकांनी तेथील राजाकडे आश्रय मागितला. या राजाने दुधाने काठोकाठ भरलेला प्याला या पारशांकडे पाठविला. याचा अर्थ माझे राज्य या दुधाने भरलेल्या प्याल्यासारखे काठोकाठ भरलेले आहे. या राज्यात तुम्हाला कुठून जागा देऊ असे त्याने या प्रतिकाव्दारे दाखवून दिले होते. पारशीधर्मियांनी या दुधात साखर घालून ती पुर्णपणे विरघळविली आणी तो प्याला परत पाठवला.
अर्थातच राजा काय समजायचे ते समजला आणि त्याने या जहाजातील लोकांना किनाऱ्यावर उतरण्याची उतरण्याची परवानगी दिली. तेव्हापासून आजपर्यंत पारशी लोक हिंदुस्थानात खरोखरच दुधात साखर बनून राहिलेले आहे.
पारशी धर्मियांच्या भारतातील सगळ्या प्रवासाबद्दल आपण पुढच्या भागात पाहूया.