पुणे – महान्यूज लाईव्ह
पुण्यात कर्करोगाने पिडीत रुग्ण व त्यांचे नातेवाईक, डॉक्टरांसाठी उम्मीद की रन ही मॅरेथॉन होणार आहे. या मॅरेथॉनचे उदघाटन करणारी व्यक्ती उम्मीद देणारी अशीच आहे.. ती आहे, गोव्याचे आयपीएस अधिकारी निधीन वाल्सन..! हो, तेच वाल्सन.. ज्यांना दुर्मिळ नॉन हॉजकिन्स लिम्फोमा हा कर्करोगाची लागण झाली होती.. ज्यांनी फक्त इच्छाशक्ती व फिटनेसच्या जोरावर हा कर्करोग पळवून लावला..!
सन २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले निधीन वाल्सन पुण्यात येत आहेत, ते कॅन्सरशी झगडणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श असेच आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाची लागण झाली. औषधे वेदना शमविण्यासाठी असतात, मात्र इच्छाशक्ती व पॉझिटिव्हनेस या दोनच गोष्टी आपल्याला यातून बाहेर काढू शकतात याची जाणीव झालेल्या वाल्सन यांनी सायकलींग व धावण्याच्या स्पर्धांमध्ये स्वतःला तयार करण्यास सुरवात केली.
अनेक मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला. पोटात प्रचंड वेदना व्हायच्या, मात्र त्या वेदना सहन करीत त्यांनी धावण्याचा वेग कमी होऊ दिला नाही. एवढेच नाही, तर नुकतीच गोव्यात भारतातील पहिली आयर्नमॅन स्पर्धा झाली, त्यामध्ये अवघ्या आठ तासात २१ किलोमीटर सहजपणे ते धावत गेले.. त्याच वेळेत दीड किलोमीटर पोहून झाले आणि ९० किलोमीटर सायकलिंग पूर्ण करून ते आयर्नमॅनही झाले..!