बार्शी – महान्यूज लाईव्ह
वर्षाच्या सुरवातीचा दिवस सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गाव व आजूबाजूच्या बांगरवाडी, वालवाड, उकडगाव गावांसाठी घातवार ठरला.. चार एकरात पसरलेल्या फटाके बनविण्याच्या कारखान्यात अचानक एक स्फोट झाला.. अन त्यापाठोपाठ उडाला हल्लकल्लोळ.. ओरडायलाही जागा ठेवली नाही अशी भीषण आग लागली आणि त्यानंतर मदतीसाठी गेलेल्यांना हाती लागले अगदी कोळसा झालेले ९ मृतदेह..!
बार्शी तालुक्यातील पांगरी आणि इतर गावांना हादरवणारी ही दुर्घटना आज सकाळी घडली. सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर फक्त आणि फक्त बार्शीच्या या घटनेचीच चर्चा होती. सकाळी शेतशिवारात असलेल्या या कारखान्यातून धुराचा लोट आणि कानठळ्या बसविणारे आवाज येऊ लागले आणि गावातील गावकऱ्यांनी या दिशेने धावायला सुरवात केली.
फक्त काही क्षणात येथे फटाक्याच्या दारुने घात केला आणि काही क्षणापर्यंत जिथे लोकांच्या सण, उत्सवात आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फिटायचे, त्या कारखान्यातील दुर्घटनेने शेकडोंच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकले.
शेतकरी या मदतीसाठी धावत गेले, तेव्हा त्यांना शेजारच्या उसाच्या शेतात दोन महिला कामगारांचे उडून पडलेले मृतदेह आढळून आले. गावकऱ्यांनी रुग्णवाहिका, प्रशासनाला संपर्क साधला, मात्र ते वेळेत पोचले नाहीत असा संतापही स्थानिकांनी व्यक्त केला.
अर्थात आग एवढी भीषण होती की, त्यातूनही काही साध्य झाले असते असे नाही, मात्र किमान दिलासा मिळाला असता. दरम्यान काही वेळानंतर पोचलेल्या प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने येथील घटनास्थळावर मदतकार्याला सुरवात केली.
आतापर्यंत ९ मृतदेह हाती आल्याची माहिती स्थानिकांनी दिली, मात्र प्रशासनाने त्याला दुजोरा दिला नाही, अर्थात अजूनही ही संख्या वाढू शकते असे मत स्थानिकांनी व्यक्त केले असून या कारखान्यात ४० कामगार काम करायचे, आज किती काम करीत होते, त्याची आकडेवारी मिळू शकली नाही.