नाशिक – महान्य़ूज लाईव्ह
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातीलम मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीला आज सकाळी लागलेली आग अजूनही धुमसत आहे. या आगीत १० ते ११ जण अजूनही अडकल्याची भीती असून अजूनही आग धुमसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची घोषणा केली असून जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती दिली आहे.
जिंदाल कंपनीत आज बॉयलरचा स्फोट झाला. यानंतर आग मोठ्या प्रमाणावर लागली. दरम्यान आगीचा भडका उडाल्यानंतर प्रशासनाने तत्परतेने यावर नियंत्रणासाठी पावले उचलली. कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आले. सकाळच्या पाळीला आलेल्या ५० हून अधिक कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले.
मात्र या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृतरित्या देण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असून परिसरात डिझेलचे टॅंक असल्याने या टॅंकपर्यंत आग पसरू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
पॉलिथीन उत्पादक असलेल्या कंपनीतील ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग आणखीच भडकली असून १० ते १२ अग्नीशामक वाहने अखंड ही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आतापर्यंत १४ कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला, आतमध्ये आता कोणी नाही असे या कामगारांनी सांगितल्याचे गमे यांनी सांगितले.