सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला केली जबर मारहाण! भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे त्यांच्यावर गुन्हा दाखल..!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला लाथा बुक्यांनी जबर मारहाण केल्या प्रकरणी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य सत्वशील शितोळे यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती यवत पोलिसांनी दिली. उत्तम सर्जेराव चव्हाण ( राहणार वाबळे वस्ती, पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे) हे शुक्रवारी ( दिनांक ३०) पाटस परिसरातील हॉटेल रेणुका मध्ये जेवण करीत असताना भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य सत्वशील मधुकरराव शितोळे तिथे आले.
सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी चव्हाण यांना तू मला ओळखत नाही? असे म्हणून लाथाबुक्यांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली. तसेच पुन्हा तू गावात कसा राहतोस हे मी बघतो अशी धमकीही दिली. या प्रकरणी उत्तम चव्हाण यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात शितोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार संजय देवकते हे अधिक तपास करीत आहेत. सत्वशील शितोळे हे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांचे चिरंजीव आहेत. तसेच दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष म्हणून ही काम केले आहे.
काही दिवसापूर्वी एका मोटार गॅरेजचे काम करणाऱ्या करमाळा तालुक्यातील एका तरुणाला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटनाही घडली होती. मात्र राजकीय दबाव तंत्र वापरत हे प्रकरण मिटवले गेले अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.