दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील ओझर्डे गावच्या हद्दीतील वाई वाठार रस्त्यावर चंद्रभागा ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावर भरघाव वेगात डंपर चालकाचा ताबा सुटल्याने पुलाचे कठडे तोडून डपर खाली गेला. डंपर सिनेमा स्टाईल पुलाच्या लोखंडी पाईपवर तरंगत होता.
चालकाचे नशीब बलवत्तर असल्यानेच हा डंपर पुलावरून अंदाजे ५० फुट खोल ओढ्यात न कोसळता तो अधांतरी तरंगत राहीला. या भीषण अपघाताची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आशीष कांबळे यांना समजताच त्यांनी पोलिस हवालदार राजेश माने यांना घटना स्थळावर पाठवले.
त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने क्रेन मागवून कोसळण्याच्या स्थितीत असणारा डंपर अलगद बाजूला काढून घेऊन वाहतूक सुरळीत केली. हा अपघात शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला. ओझर्डे येथील हा पुल सकाळी नेहमीच रहदारीचा असतो, पण सुदैवाने अपघातसमयी त्या ठिकाणी कोणीच नसल्यामुळे जिवीतहानी झाली नाही.
अपघात होताच चालकाने डंपरमधून बाहेर उडी टाकल्याने तो सुखरूप बचावला. पण डंपर व पुलाचे नुकसान झाले. हा पुल अरुंद असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघातांची मालिका सुरू असते. या पुलाची वयोमर्यादा संपली आहे, या ठिकाणी नवीन पुल बांधण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यातील ब्रिटिशांनी बांधलेले अनेक पुल पाडून त्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आल्याचे पहावयास मिळते, पण दुर्दैवाने पोलादपुर पंढरपूर या महामार्गावर २४ तास रहदारीच्या असणाऱ्या या पुलाच्या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुल उभारणीसाठी जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह ओझर्डे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. येथील अरुंद पुलात किती जणांचे बळी घेतल्यावर येथे नवीन पुल उभारला जाणार असा संतप्त सवाल ओझर्डे ग्रामस्थांसह वाहन चालकांनी विचारला आहे .