सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे जिल्हा बँका आणि सोसायटी यांना देखील वन टाइम सेटलमेंट अर्थात एक रकमी कर्ज परतफेडीचा अधिकार मिळाला पाहिजे याकरता महान्यूजने मोहीम उघडली होती. त्याचे समर्थन शेतकऱ्यांनी केलं असून निमगाव केतकीत शेतकरी पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जाऊन गांधीगिरी केली. आम्हालाही सोसायट्यांना वन टाइम सेटलमेंटचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा बँकेने नाबार्ड आणि केंद्र सरकारकडे मागणी करावी. रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी करावी, अशा प्रकारची मागणी या शेतकरी आंदोलक पदाधिकाऱ्यांनी केली.
देशातील बड्या उद्योगांनी गेल्या पाच वर्षांमध्ये सात लाख कोटी तर गेल्या दहा वर्षांमध्ये 13 लाख कोटी रुपयांना बँकांना चुना लावला. यामध्येही कर्ज राईट ऑफ करण्यात आली आहेत. मोठ्या उद्योगांना कर्ज राईट ऑफ होतात आणि सामान्य शेतकऱ्यांची मात्र कर्ज तशीच राहतात.
एवढेच नाही, तर दोन लाखापासून पाच लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या प्रवेशद्वारावर राहतात. यामुळे शेतकरी गेल्या काही दिवसापासून संतप्त आहेत. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सहकारी बँकांनाही एक रकमी कर्ज परतफेडीचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
महान्यूज लाईव्ह ने ही या संदर्भात आवाहन केल्यानंतर आता शेतकऱ्यांनी देखील मोहीम उघडली आहे. याची सुरुवात इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथून झाली. यावेळी शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प दिले आणि शेतकऱ्यांच्या मनातील हा प्रश्न वरिष्ठांपर्यंत पोहोचावा आणि जिल्हा सहकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या भावना रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचवाव्यात. अन्यथा येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक नवे आंदोलन हाती घ्यावी लागेल, असा इशारा देखील यावेळी शेतकरी पदाधिकाऱ्यांनी दिला.