लक्ष्यवेध : लक्ष्मण जगताप, बारामती
वय वर्ष 73…लातूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील एक सामान्य माणूस उरण सारख्या ठिकाणी गेली तीस वर्षे अखंडपणे औषध वाटपाचे काम करत आहे. मोठ्या दवाखान्यात त्यांनी केलेला मदतीचा यज्ञ या दवाखान्यातील प्रमुखांनाही भावला. त्यातून अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना महागडी वाटणारी औषधे भेट म्हणून मिळत गेली आणि ती औषधे सरकारी दवाखाना भेट देण्याचा प्रपंच या माणसाने सुरू केला आजवर राज्याच्या विविध जिल्ह्यात पावणेदोन कोटी रुपयांची औषधे या माणसाने भेट म्हणून दिले आहेत….
आयुष्य जिकिरीचं असतं… समस्यांनी भरलेलं असतं.. पण त्यातून देखील रडकुंडीचा डाव न मानता आयुष्य घडवणारा संग्राम करून इतरांच्या आयुष्यात मदतीचा नंदादीप तेवत ठेवण्याचे काम करणाऱ्या या अवलियाची ही कथा…!!
‘स्वतः साठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ‘या विचाराने प्रेरित झालेली माणसे माझा जन्म कशासाठी झाला आहे ? मी कशासाठी जगतो? आणि माझे जीवनाचे ध्येय काय? असा विचार करून आपले सर्व आयुष्य समाजासाठी वेचतात. समाजाच्या कल्याणासाठी धडपडत असतात. अशी जी काही थोडी माणसं आहेत त्यात प्रामुख्याने ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे लातूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील संग्राम तोगरे यांचे.
संग्राम सात वर्षाचा असताना वडीलांनी या जगाचा निरोप घेतला. वडीलांच्या मायेला पोरके झालेल्या संग्रामचा जीवन संघर्ष येथूनच ख-या अर्थाने सुरु झाला. अत्यंत हलाखीच्या आणि बिकट परिस्थितीत आईने संग्रामचे संगोपन केले. मोलमजुरी व काबाडकष्ट करून ५वी पर्यंत शिकविले. कामाच्या निमित्ताने सतत बाहेर फिरावे लागत असल्याने परभणी सारख्या शहरात दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना परीक्षा केंद्र दूर असल्याने परीक्षा देता न आल्याने गुणपञकावर गैरहजर शिक्का पडला. तरीही हार न मानता संग्रामने मुंबई गाठली. पडेल ते काम करुन मोलमजुरी करून राञशाळेत प्रवेश घेऊन शिक्षण चालू ठेवले. परंतु पैशाअभावी तेही अर्धवट मध्येच सोडून द्यावे लागले. परिस्थितीशी कसे लढायचे हे संग्राम उघड्या डोळ्यांनी पाहत होता.आपल्या आईचे कष्टही पाहत होता. नंतर एका केंद्रीय विद्यालयात पस्तीस वर्षे शिपाई म्हणून नोकरी केली. संग्राम यांनी लहानपणी दुःख ,दारिद्रय आणि गरीबी किती भयंकर असते हे अनुभवलेले होते.
समाजासाठी जीवन व्यतीत केलेल्या महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, बाळासाहेब ठाकरे या थोर लोकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आण्णाभाऊ साठे मातंग क्रांती मंच या सेवाभावी संस्थेची स्थापना करुन आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला. आपले आयुष्य समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, पिडीत, वंचित या घटकांसाठी घालवायचे असा ठाम निर्धार केला. उरण ही आपली कर्मभूमी समजून आपल्या सामाजिक कार्याला सुरूवात केली. दुःखीतांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा निश्चय केला. हाच निश्चय संग्राम यांना नवी ओळख देऊन वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.
संग्राम यांनी केलेल्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार, मान सन्मान मिळाले आहेत. अमाप प्रसिद्धीही मिळाली. त्याच्या मागे आहे त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ! मी समाजाचे, देशाचे काही तरी देणं लागतो ही भावना परिस्थितीने त्यांच्यात निर्माण केली. ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात ही भावना जागृत होईल त्यावेळी समाजातील प्रत्येकाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
संग्राम यांनी समाज आणि सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करताना एक अभिनव असा उपक्रम सुरू केला. ज्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि जवळपास पंचवीस जिल्ह्यात पोहचला. स्वतःच्या कमाईतील व लोकांच्या देणगीतून गोळा झालेल्या निधीतून औषधे दान करण्याचा उपक्रम हाती घेतला.
तोगरे यांनी एका दवाखान्यापुढे एक बॉक्स मांडून त्यामध्ये ज्यांना आवश्यक नाहीत, परंतु वापरलेली नाहीत अशी औषधे ठेवावीत असे आवाहन त्यांनी केले. पहिल्या महिन्यामध्ये त्यामुळे फारशी औषधी गोळा झाली नाहीत, मात्र त्यानंतरच्या काळात त्यांचा उपक्रम पाहून दवाखाने पुढे आले त्यांच्या बॉक्समध्ये औषधे पडत गेली.
औषधे वाढत गेली. खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील त्यांना मदत करण्यासाठी पुढे आली आणि ही जमा झालेली औषधे त्याची पूर्ण खातरजमा करून ती सीलबंद आहेत, गोळ्यांच्या पाकिटावरील वैधता कालावधी व्यवस्थित आहे, याची पूर्ण खात्री करून ते औषधे सरकारी दवाखान्यांना भेट देऊ लागले.
सरकारी दवाखान्यांमध्ये येणार वर्ग हा अल्प उत्पन्न गटातील श्रमिक वर्गातील आहे, त्याच्याकडे फार पैसे नसतात. त्यांना जर ही औषधे मोफत मिळाली, औषधाचा खर्च कमी झाला, तर त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा हातभार होईल, अशी त्यामागची कल्पना होती आणि हा यज्ञ हळूहळू वाढत गेला.
गेल्या वीस पंचवीस वर्षात तोगरे यांनी वेगळ्या दवाखान्यांमध्ये मिळून गोळा केलेली आणि वितरित केलेल्या औषधांची किंमत एक कोटी 66 लाखाहून अधिक आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की, हा दवादान प्रपंच किती मोठा आहे..!
अशी समाजसेवा करण्यासाठी रक्तातच मानवसेवा असावी लागते. ती संग्राम यांच्यात आहे. म्हणून कितीही ञास झाला, वाईट प्रसंग आले तरी ते डगमगले नाहीत. उलट आणखी जोमाने त्यांनी हे समाजसेवेचे व्रत हाती घेतले. आजारी लोकांच्या आयुष्यात सुखाची कारंजी फुलविण्याचे त्यांचे हे कार्य प्रशसंनीय आहे.
समाजसेवा करणे हे कोणाचेही काम नाही .त्यासाठी मनात असावा लागतो मनात निस्वार्थी सेवाभाव आणि त्याग..!
संग्राम यांनी हाती घेतलेला हा समाजसेवेचा वसा उरण ची मुंबईची सीमा ओलांडून सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात पोहचला आहे. त्यांनी भागातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन दिली आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण केले. त्यांच्या मुलांना औषधे, कपडे तसेच शालेय साहित्य देण्याचे मोठे काम केले आहे.
मुक्त वाचनालयाची संकल्पना राबवून वाचन चळवळ विकसित केली आहे.आपल्या अडचणी सोडविण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून आदिवासी बांधवात आपली प्रतिमा निर्माण केली आहे.
त्यांच्या या कार्यात सहचारिणी सौ.सुमनताई तोगरे मोलाची अशी खंबीर साथ देत आहेत. मुक्ताई महिला उत्कर्ष या मंडळाची स्थापना करुना आपल्या पतीला कार्यात योगदान देत आहेत.
परिस्थितीचे चटके बसलेला माणूसच दुसऱ्याची परिस्थिती जाणतो.त्यांच्या दुःखावर फुंकर घालतो.त्यांचे जगणे आनंदी होण्यासाठी धडपडतो.म्हणून दुसऱ्यांना आनंद वाटणारी माणसे खरा आनंद मिळवितात.
तोगरे दांपत्याने लोकसेवेलाच आपले जीवन मानून उभा केलेला हा समाजसेवेचा डोंगर खरोखरच इतरांना दिपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी आहे यात कोणतीच शंका नाही. याही पुढे जाऊन त्यांना मानवतेचे पुजारी म्हटलं तरी ते साजेसे ठरेल.












तोगरे साहेबांचं हे समाजकार्य खरोखरच खूप वाखाणण्याजोगे आहे त्यांची ही औषधे दानाची व रुग्णसेवा अशीच वर्षानुवर्ष सुरू राहू व त्यांचा आदर्श घेत समाजातील इतर लोकांनीही पुढे येवोत, की गणराया पुढे प्रार्थना