शिरूर – महान्यूज लाईव्ह
कवी हा केवळ कविता लिहीत नाही तर तो अनुभवलेली वेदना समाजासमोर मांडत असतो, ग्रामीण भागातील साहित्यिकांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत डॉ.अखिलेश राजुरकर यांनी व्यक्त केले.
मांडवगण फराटा येथील कवी राहुल शिंदे यांनी लिहिलेल्या “नव्या शोधात” या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.राजुरकर हे बोलत होते. पुढे बोलताना डॉ.राजुरकर म्हणाले की,पूर्वी शहरी भागातून लेखक, साहित्यांकडून अधिकाधिक दर्जेदार आशय निर्मिती केली जात होती.मात्र हेच चित्र बदलत असून ग्रामीण भागातूनही लेखक, साहित्य निर्मिती करत आहे. ही मोठी सकारात्मक बाब आहे. उदयोन्मुख कवी राहुल शिंदे यांनी खडतर संघर्षातून निर्मिती केलेले पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारे ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. धनंजय शिंदे यांनी बोलताना सांगितले की, कवी राहुल शिंदे यांनी कमी वयात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. कुटुंब मोलमजुरी करत असून त्यांनी दिलेले संस्कार यामुळेच राहुलने अल्पवयात साहित्यिक म्हणून घेतलेली झेप अनेकांना प्रेरणा ठरणारी आहे.
यावेळी लेखक कवी राहुल शिंदे यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात जे अनुभव घेतले, ग्रामीण भागात जे वास्तव होते ते शब्द रुपात कवितेतून साकारले गेले. यामध्ये ऑनलाईन शाळांचे वास्तव, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. यात आई वडील व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी मुख्याध्यापिका योगिता साळवे, माजी सरपंच सीमा फराटे, माऊली ट्रस्टचे सचिव नारायण जगदाळे, डॉ. अमोल खोडदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्या देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन मानसी ताटिया यांनी केले. श्रीमंत गदादे यांनी उपस्थितांचे आभार मानले.