पुणे – महान्यूज लाईव्ह
अलिकडच्या काही महिन्यांत पुणे जिल्ह्यात अनेक पोलिस ठाण्यांमध्ये लाचखोरी करणाऱ्या शिपाई, हवालदार, फौजदार अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरीचे सापळे लावून झाले.. पण पोलिसांची पैशाची भूक काही संपत नाही.. आजही एक फौजदार २ लाखांची लाच मागताना जेरबंद झाला.
पिंपरी चिंचवडमधील पिंपरी पोलिस ठाण्यात फौजदार असलेला ३१ वर्षीय रोहित गणेश डोळस हा फौजदार लाचखोरीत अडकला. डोळस हा नुकताच कार्यरत झालेला असूनही त्याची पैशाची हावही हजारांत नाही, तर लाखांत असल्याने पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्याविषयी नाराजीच होती.
त्यातच तुझ्या भावाविरोधात एक तक्रार आल्याचे सांगून डोळस याने बोलावून घेतल्यानंतर लाच मागितली, त्यावरून संशयित आरोपीच्या भावाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने अधिकाऱ्यांना डोळस हा भावास आरोपी न करण्याच्या बदल्यात व त्याच्याविरोधात आलेला अर्ज दिवाणी बाब असल्याचे सांगून फाईल करण्यासाठी २ लाखांची लाच मागत असल्याची तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने केेलल्या पडताळणीत डोळस याने २ लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे लाच मागितल्याचा गुन्हा फौजदार डोळस याच्या विरोधात दाखल करण्यात आला व डोळस याला अटक करण्यात आली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पुणे युनिटचे पोलिस निरीक्षक भरत साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पोलिस उपायुक्त अमोल तांबे, अप्पर पोलिस अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने केली.