सोलापूर – महान्यूज लाईव्ह
सोलापूरच्या भूमी अभिलेख खात्याच्या कार्यालयात गेली अनेक दिवस हेलपाटे मारूनही जमीनीचा नकाशा न देणाऱ्या कार्यालयात अखेर शेतकरी नागडा झाला..तुम्हाला लाच द्यायला मी चोरी करू का? आम्ही म्हाताऱ्या शेतकऱ्यांनी पैसे कोठून आणायचे? असा प्रश्न करीत माझ्याकडे द्यायला काहीच नाही म्हणत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील शेतकरी कुमार नामदेव मोरे यांनी नागडे होऊन आंदोलन केले.
मोरे फक्त वास्तवात नागडे झाले. मात्र त्यांच्या या अभिनव आंदोलनाने भूमी अभिलेख खात्यालाच नागडे करून टाकले. मोरे या्ंच्या जमीनीत जायला रस्ता नाही, म्हणून तहसीलदारांकडे त्यांनी अर्ज केला. त्यानंतर तेथे त्यांना जमीनीचा नकाशा भूमी अभिलेख खात्याकडून आणण्याची सूचना करण्यात आली.
त्यावरून ते भूमी अभिलेख खात्याच्या कार्यालयात गेले. तेथे नोंदणी केली. त्यानंतर भूमी अभिलेख खात्याने तो नकाशा देण्याची तारीख मोरे यांना दिली. मोरे त्या तारखेला गेले. मात्र त्यांची दखल कोणीच घेत नव्हते.
मोरे हे सकाळपासून कार्यालयात आले होते. मात्र कोणीच त्यांच्याकडे लक्ष देईना.. मग आपली अशी दखल घेत नाहीत, मग तशी तरी घेतील, म्हणून थेट कपडे काढले, मग मात्र सर्वांचीच धावपळ उडाली. मोरे तेवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या घराबाहेरही मी नागडा होईल असा इशारा दिल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय हादरले आणि त्यांनी जमीनीचा नकाशा मोरे यांना दिला.