वाईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ६ तासात खुनातील आरोपी केले गजाआड! कौटूंबिक वादाचा बदला घेण्यासाठी मित्रांच्या मदतीने चुलत भावाचा केला खून!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
काल वाईतील सिद्धनाथवाडीतील न्यास शिवाजी खरात या 17 वर्षीय शाळकरी पोराचा जो अत्यंत निर्घृण पद्धतीने खून झाला होता, त्याची उकल पोलिसांनी अवघ्या सहा तासात केली. वाईच्या पोलिसांची ही कौतुकास्पद कामगिरी असतानाच, दुसरीकडे या तपासातून जे पुढे आले आहे, त्याने सिद्धनाथवाडीच नाही, तर संपूर्ण वाई तालुक्याला धक्का दिला आहे. कौटुंबिक वादातून व पूर्व वैमनस्यातून एकाने मित्रांच्या मदतीने अल्पवयीन चुलत भावाचा धारदार शस्त्राने हा खून केला.
सिद्धनाथवाडी वाई परिसरात बुधवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. या खुनाची सहा तासात उकल करण्यात वाईच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांना डिबी पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
न्यास शिवाजी खरात असे खून झालेल्या अल्पवयीन युवकाचे नाव आहे.न्यास खरात बारावी मध्ये शिरवळ येथील एका महाविद्यालयात शिकत होता. तो दररोज पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे प्रशिक्षण घेत होता. बुधवारी दुपारीं तीन वाजता घरातून निघून गेला होता. तो घरी न आल्यामुळे रात्री नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना माहिती दिली.
यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याच्या फोनच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी रात्रभर सिद्धनाथवाडी परिसरातील शेती परिसरात शोध मोहीम राबविली. मात्र त्याचा शोध लागत नव्हता .पण सकाळी त्याचा मृतदेह धोम धरणाच्या कालव्यालगत एका शेताच्या झाडीत आढळून आला.
त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शास्त्राने अनेक वार करण्यात आले होते. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाची माहिती शहरात पसरतात घटनास्थळी बघ्यानी मोठी गर्दी केली. नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. सातारा येथून ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे व परिसरात माहिती घेऊन अनेक जणांकडे चौकशी करून तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक डॉ शितल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश पवार उप निरीक्षक स्नेहल सोमदे वाईच्या डिबी पथकातील विजय शिर्के, किरण निंबाळकर श्रावण राठोड सोनाली माने प्रसाद दुदुस्कर उमेश गहीन,अजित जाधव आदीनी तपस कामात भाग घेतला.
खरात कुटुंबीयांमध्ये जमिनीचा वाद होता. त्यामुळे या वादातून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वाईचे पोलिस अधिकारी व पोलिस टिमने कौतुकास्पद कामगिरी केली आहे असेही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.