वरवंड येथील विद्यार्थी हाणामारीच्या प्रकरणात १६ जणांवर गुन्हा दाखल! पाटस पोलिसांची कारवाई!
राजेंद्र झेंडे महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथे भर चौकात कॉलेजच्या आवारात दोन विद्यार्थ्यांच्या गटात फिल्म स्टाईल तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी सर्वांचीच आळी मिळी गुपचिळी होती. मात्र काल महान्यूज चा व्हिडिओ जनतेसमोर आणला. त्याला राज्यभरातील दर्शकांनी पाहिले आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी अत्यंत गांभीर्याने हा प्रकार घेऊन तातडीने पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी पाटस पोलिसांनी तब्बल १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी दिली. रोहन दुर्गुडे, प्रकाश टेंगले, प्रणव टेंगले, जिवन टेंगले, संग्राम खराडे, माऊली खोमणे, स्वराज खोमणे ,गोविंद टेंगले याचा भाऊ पुर्ण नाव माहीत नाही व इतर ६ ते ७ ) अशा १६ ते १७ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, २३ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावरील रोडच्या उडाणपुलाजवळ चौकामध्ये शालेय विद्यार्थीच्या दोन गटात हाणामारी सुरू होती. यामध्ये वरवंड गावातील काही लोकांचा ही सहभाग होता.
या घटनेचा व्हिडिओ महान्यूज लाईव्ह ने प्रसारित केला. घटना उलटून पाच-सहा दिवस झाल्यानंतरही काही हालचाल न झाल्याने नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान या कालावधीत पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान या घटनेची दखल पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनीही गांभीर्याने घेतली. त्यांनी या संदर्भात सखोल चौकशी करून तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या आदेश दिले. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर १६ जणांवर सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे, शांततेचा भंग केल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दिनांक ३० ) गुन्हा दाखल केला.
पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर यांनी याबाबत दिली आहे. दरम्यान या प्रकरणी महान्यूज लाईव्ह ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तर मारामारी होऊन पाच-सहा दिवसाचा कालावधी उलटूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने वरवंड परिरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.