दिल्ली : महान्यूज लाईव्ह
आजची सकाळ देश वासियांसाठी दुःखदायक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी आज 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, तर दुसरीकडे महान जागतिक फुटबॉलपटू पेले यांचेही निधन झालं. फुटबॉल जगावर पेले यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
18 जून रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे आज अहमदाबादच्या युएन मेहता रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद भाई, सोमभाई मोदी, अमृत भाई मोदी, पंकज भाई मोदी, वासंती बेन असा परिवार आहे.
त्यांची प्रकृती चार दिवसापूर्वी बिघडल्याने त्यांना तात्काळ अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नरेंद्र मोदी देखील आईची प्रकृतीची विचारपूस करून दिल्लीला परतले होते. वृध्दापकाळ आणि प्रदीर्घ आजार यामुळे हिराबेन यांच्या प्रकृतीने उपचारांना साथ दिली नाही. हिराबेन यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या आईला श्रद्धांजली वाहिली.
पेले यांनी घेतला अखेरचा निरोप!
ब्राझीलचे महान जागतिक फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. पेले यांची मुलगी केली न्यासीमेंटो यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट करून पेले यांना श्रद्धांजली वाहिली. नोव्हेंबर महिन्यात पेले यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी पेले यांच्या मुलाने त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
तीन वेळा विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू अशी पेले यांची ओळख होती. मागील वर्षी पेले यांची ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना कर्करोग होता. पेले यांच्यामुळे ब्राझील हा जगातील सर्वात यशस्वी फुटबॉलचा संघ म्हणून उदयास आला होता. आयुष्यभरात पेले यांनी १२८२ गोल केले होते.