पुणे महान्यूज लाईव्ह
आळंदी येथील चऱ्होली खुर्द येथील ही साठा उत्तराची कहाणी.. पोलिस कोठडीत संपणारी..कामातुरानां ना भयं ना लज्जा.. याच्यापुढे जाणारी ही कहाणी.. एखाद्या सिनेमातही अशी कथा सापडणार नाही.. कारण ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, ज्याच्या दशक्रिया विधीचे फलक गावागावात लागले, तोच खूनी निघाला.. तोच पोलिसांना सापडला..!
या घटनेत पोलिसांनी ६५ वर्षीय सुभाष केरबा थोरवे याला अटक केली असून त्याने खेड तालुक्यातील धानोरे गावातील ४८ वर्षीय रवींद्र भिमाजी घेनंद यांचा खून केला होता. तोही कशासाठी तर हकनाक!
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुभाष थोरवे याची एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधातून त्याला त्या महिलेसोबत दूर कोठेतरी जाऊन कायमचे राहायचे होते. मग त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. तो करण्यासाठी त्याने घेनंद यांचा वापर केला आणि निष्पाप घेनंद यांचा यामध्ये बळी गेला.
सुभाष थोरवे याने त्याच्या शेतात घेनंद यांना बोलावून घेतले. गोड बोलून शेतात नेले. तेथे त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले व मानेपासून डोके वेगळे करून स्वतःच्या अंगावरील कपडे घेनंद यांच्या मृतदेहावर घातले व त्याला शेतातील रोलरमध्ये फिरवले.
थोरवे याने त्याच्या स्वतःच्या मृ्त्यूचा बनाव रचला, त्यानंतर थोरवे याचे कुटुंबिय तेथे पोचल्यानंतर तेथे फक्त कपडेच दिसले. मग ते थोरवे याचेच असल्याचे समजून कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. दहाव्याचा विधीही गावात घेतला.
मात्र या प्रकरणाची गावात थोडी चर्चा झाली आणि झाले असे की, दहाव्याच्या विधीचे फलक जे गावात लावले होते, त्याची माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिल्याने पोलिसांनी सुभाष थोरवेला पकडले. मग खरी खबरबात पोलिसांना समजली आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी थोरवे याला घेनंद यांच्या खूनप्रकरणी अटक केली आहे. आता बाईही नाही..अन संसारही नाही..!