संपादकीय : घनश्याम केळकर
” प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच आणी आमच अगदी सेम असत. ” अस मंगेश पाडगावकर म्हणून गेलेत. पण तेव्हाही आणि आजही यावर एक प्रश्नचिन्ह उभे आहे. खरेच सगळच प्रेम सेम असत?
खरतर प्रेमाची ही गुथ्थी आजवर कोणालाही सोडवता आलेली नाही. या प्रेमाभोवती जाती, धर्माचे, प्रथा परंपरांचे अनेक नियम आणि चौकटींचे पहारे आजवर बसवून झाले, पण साल हे प्रेम त्यातूनही अचानक निसटून जात. मग कुठेतरी आपल्या आजुबाजूला,वर्तमानपत्रात ,टिव्हीवर ऐकायला , वाचायला मिळतात प्रेमाच्या कहाण्या. घरच्यांनी विरोध केला म्हणून पळून जाणाऱ्यांच्या, अनेकदा दोघांनीही आपल्या जीवाचा अंत करून घेतल्याचा. एकमेकांशिवाय आम्ही जगूच शकत नाही म्हणून दोन माणस आपले जीवनच संपवून टाकतात. यालाच प्रेम म्हणतात का ? असो, या विषयावर बोलायला बसलो तर वेळ कधीच पुरणार नाही. आज आपण बोलणार आहोत ते लव्हजिहादवर. प्रेमाचा बुरखा पांघरून आपल्या धर्माच्या अनुयायांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिहादींबाबत.
लव्ह म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे धर्मासाठी युद्ध. हे दोन्ही शब्द एकत्र येऊन बनतो लव्ह जिहाद. सध्या जगभरात काय चाललय हे पाहण्यासाठी टिव्हीपुढे बसलो तर तिथे अनेकदा या लव्हजिहादची चर्चा सुरु असते. आज आपल्यापुढे ज्या तातडीने सोडवल्या पाहिजेत अशा समस्या आहेत, त्यातील सर्वात मोठी समस्या ही लव्हजिहाद ही आहे असे या टिव्ही चॅनेलवर चर्चा करणाऱ्यांचे म्हणणे असते. त्यामुळे या लव्हजिहादवर बंदी आणली पाहिजे असे ते तावावावाने सांगत असतात. त्यांच्या या चर्चा ऐकल्यावर असे लक्षात येते की भारतातील मुस्लीम पालक दररोज आपल्या तरुण मुलांना ( मुलींना नाही, फक्त मुलांना ) सांगत असतात की बाहेर जा, आणि एखादी हिंदू मुलगी पटव. आम्हाला सून पाहिजे ती हिंदूच पाहिजे. लग्न करताना तिला आपण मुस्लीम करून घेऊ, म्हणजे आपल्या धर्मात एक माणुस वाढेल. एक मुस्लीम म्हणून तुझे हे कर्तव्य आहे. मग ही सगळी मुस्लीम तरुण मुले बाहेर पडतात आणि हिंदू मुलींना पटवायच्या मागे लागतात. हिंदू मुली बिचाऱ्या भोळ्याभाबड्या. त्या यांच्या जाळ्यात अडकतात. प्रेमात फसतात आणि मुस्लीम धर्म स्विकारतात. त्या मुस्लीम झाल्यानंतर ही मुले त्यांना सोडून देतात आणि दुसऱ्या हिंदू मुलीच्या मागे लागतात. हे भयंकर आहे, अती भयंकर आहे. आपल्या धर्मावर हे अतीशय मोठे संकट आहे, टीव्ही अॅंकर मोठमोठ्याने ओरडत राहतो.
टिव्ही बंद करून ज्यावेळी आपण आपल्या आजूबाजूला शोध घ्यायला लागतो तेव्हा मात्र चित्र अगदी वेगळेच दिसते. भारतीय समाज हा आपल्या जातीला आणि धर्माला चिकटून राहणारा समाज आहे. हिंदू धर्मातील ९९ टक्क्यांपेक्षाही जास्त लग्ने ही आपापल्या जातीत होतात. मुली आणि मुलेदेखील समोरचा किंवा समोरची आपल्या जातीतील आहे का हे बघून मग त्याच्यावर प्रेम करतात, अशी इथली परिस्थिती आहे. दुसरीकडे भारतातील मुस्लीम समाजातही ही जातीव्यवस्था शिरलेली आहे. तिथेदेखील आपल्या जातीबाहेर जाऊन लग्न करणे फारसे स्विकारले जात नाही. मुस्लीम धर्मातही ९९ टक्क्यांहून जास्त लग्ने ही आपल्या जातीत नाहीतर कमीत कमी आपल्या धर्मातच होतात, ही कोणतीही आकडेवारी काढून पाहिली तरी सिद्ध होणारी गोष्ट आहे.
मग लव्हजिहाद नावाचा प्रकार खरेच अस्तित्वात आहे का ? का केवळ मुस्लीम धर्माला बदनाम करण्यासाठी केला जाणारा हा केवळ एक प्रपोगंडा आहे ? इंटरनेटचा आधार घेऊन थोडासा अभ्यास केला तरी लक्षात येते की लव्हजिहाद ही काही काल्पनिक गोष्ट नाही, तर खरोखरच अस्तित्वात असलेली गोष्ट आहे. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाने इतर धर्मातील लोकांना इस्लामची दिक्षा दिली पाहिजे. सगळे जग इस्मामच्या झेंड्याखाली आले पाहिजे यासाठी काम करणे हे प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे हा धर्म सांगतो. त्यामुळे कोणत्याही साधनाचा वापर करा, पण मुस्लिमांची संख्या वाढवा असे अनेक मुल्ला मौलवी अगदी खुलेआम सांगताना तुम्हाला दिसतील. यापुर्वीच्या काळात तलवारीच्या जोरावर लोकांना इस्लाममध्ये आणण्यालाही इस्लामने मान्यता दिलेलीच आहे. सध्याच्या काळात तलवारीच्या जोरावर हे करता येत नसेल तर प्रेमाचे साधन वापरा. तुम्हाला चार लग्ने करण्याची परवानगी दिलेली आहे, मग त्यातील एकतरी बायको बिगर मुस्लीम करा आणि लग्न करताना तिला मुस्लीम धर्मात आणा. यातून तुमच्या पदरात मोठे पुण्य पडेल असे हे मौलवी सांगताना दिसतात.
ज्यावेळी इस्लामचा झेंडा बुलंद होता, इस्लामच्या तलवारीच्या धारेखाली युरोप आणि आशिया धाराशायी होत होता, त्यावेळी इस्लामच्या अनुयायांनी लग्नसंबंधांच्या आधारावर लाखो करोडो महिलांना इस्लामध्ये आणले, ही इतिहासात थोडेजरी डोकावले तरी लक्षात येणारी गोष्ट आहे. पण आता जमाना बदलला आहे, आता इस्लामची ती ताकद राहिलेली नाही. आणि आता त्या मध्ययुगीन प्रथा परंपरांनाही मान्यता राहिलेली नाही. युद्धातील विजेत्यांने पराजितांच्या बायका मुलांचा वापर गुलाम म्हणून करण्याच्या प्रथेला ऐकेकाळी समाजमान्यता होती. आज ती राहिलेली नाही. पुर्वी एकापेक्षा जास्त बायका करणे यालाही समाजाची मान्यता असायची. पण आता अशा विवाहांकडेही समाज तुच्छतेच्या नजरेने बघतो. त्यामुळे बहुपत्नीत्वाचे प्रमाणही सगळ्या जगात मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. याला बदललेली आर्थिक स्थितीही कारणीभूत आहे. धर्माने कितीही सांगितले तरी आजच्या परिस्थितीत जिथे एक संसार सांभाळणे अवघड होऊन बसले आहे, तिथे चार चार संसार थाटून त्यांना सांभाळणे कोणत्याही सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. याच कारणामुळे मुस्लीम समाजातही एकापेक्षा जास्त बायका करण्याचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे.
तरुण मुले आणि मुली यांच्या हार्मोन्सच्या बदलामुळे एकमेकाविषयी मोठे आकर्षण निर्माण होत असते. हा निसर्गाचा नियम आहे. याचाच फायदा घेऊन तरुण मुलींना प्रेमाच्या नावाखाली, शारिरिक संबंधांच्या आकर्षणापोटी जाळ्यात ओढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या सगळ्या जगभर अस्तित्वात आहेत. मानवी तस्करीचा हा अब्जावधी रुपयांचा व्यवहार आहे. या जाळ्यात अडकलेल्या मुलींना या बाजारात विकले जाते हीदेखील वस्तुस्थिती आहे. यामध्ये कुठलेही जाती, धर्माचे बंधन नाही. विकणारे आणि विकले जाणारे हे सर्व धर्मातील आणि पंथातील आहेत हेदेखील आपल्याला स्पष्टपणे दिसते.
या सगळ्या व्यवहाराच्याच एका बाजुला लव्हजिहाद आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुस्लीम तरुणांना धर्मासाठी असे काम करण्याची प्रेरणा दिली जाते. एकीकडे शारिरिक गरज पुरी होते, दुसरीकडे पैसा मिळतो आणि पर धर्मासाठी काम केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुस्लीम तरुण याकडे आकर्षित होतात. त्यामुळे मुस्लीम धर्मातील अतिरेकी विचारांचे ग्रुप अशा तरुणांना हाताशी धरतात. दुसरीकडे धर्माच्या नावाखाली जो प्रपोगंडा चालतो त्याला अगदी सुशिक्षित घरातील तरुणही बळी पडतात लग्नासाठी इतर धर्मातील मुलींच्या मागे लागतात. ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अशा प्रवृत्तीला रोखणे हीदेखील काळाची गरज आहे.
परंतू या विषयावर ज्या सवंग पद्धतीने चर्चा होते, ज्या पद्धतीचा प्रपोगंडा होतो त्यावरून अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा सगळ्या मुस्लीम धर्माला बदनाम करणे, मुस्लीम धर्मातील प्रत्येक व्यक्तीबाबत समाजात शंका निर्माण होईल असे वातावरण तयार करणे हा हेतू जास्त दिसून येतो. हिंदू धर्मातील अतिरेकी गट लव्हजिहादच्या नावाखाली ‘ हिंदू खतरेमे है ‘ हे प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एकुणच दोन्ही धर्मातील कडव्या विचाराची मंडळींना लव्हजिहादचे प्रोटीन फारच पसंद पडलेले आहे. पण आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेतला अशा अतिरेकी विचाराने नेहमी मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे या विषयावरही डोके थंड ठेवून विचार करणे फार गरजेचे आहे.
खरे तर जास्तीत जास्त आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्ने होणे हे सगळा भारतीय समाज एकसंध होण्यसाठी अत्यंत गरजेचे आहे. यासाठी च भारतीय घटनेनेदेखील अशा विवाहाना मान्यता दिलेली आहे. आतापर्यंतची सरकारे अशा विवाहांना प्रोत्साहन देत आलेली आहेत. असे विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहनपर काही रक्कम देणाऱ्या सरकारी योजनाही आहेत. असे विवाह जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढी आपली एक भारतीय म्हणूनची ओळख ठळक होईल आणि जाती धर्माची बंधने ढीली पडत जातील. पण वस्तुस्थिती ही आहे की आजही अशा लग्नांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज जगात सगळ्यात जास्त आंतरधर्मीय, आंतरवंशीय लग्ने अमेरिकेत होतात. अमेरिकेच्या सगळ्या लोकांना आपण अमेरिकेन असल्याचा अभिमान सगळ्यात जास्त आहे. धर्म आणि वंश त्याानंतर येतात. त्यामुळे एक भारतीय म्हणून जर आपल्याला उभे रहायचे असेल तर अशा लग्नांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
पण मग जाती आणि धर्माच्या आधारावर ज्यांचे सगळे अस्तित्व आहे, त्यांचे कसे होणार? या आधारावर राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांचे कसे होणार? ज्यांनी जाती धर्माच्या पट्ट्या आपल्या डोळ्यावर बांधून घेतलेल्या आहेत, धर्माच्या नावाखाली जीव देण्याची आणि जीव घेण्याचीही ज्यांनी तयारी केली आहे, अशांना मग लव्ह जिहादसारख्या टॉनिकची गरज लागते. या माध्यमातून दोन्ही धर्मातील लोकांची मने कलुषित करण्याची स्पर्धा सुरु होते आणि मग आपण कुठल्यातरी जातीचे किंवा कुठल्यातरी धर्माचे होतो, भारतीय होत नाही.
या सगळ्या विषयाची एक बाजू आहे ती म्हणजे महिलांना गृहीत धरण्याची. तरुण मुली स्वत:च्या भल्याचा विचार स्वत: करु शकत नाहीत हे दोन्ही धर्मातील अतिरेक्यांनी गृहीतच धरले आहे. त्यामुळे या मुलींनी कुणाशी लग्न करावे हे ठरविण्याचा जिम्मा यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. महिलांना स्वतंत्र अस्तित्व नाकारण्याची जी मध्ययुगीन विचारधारा आहे, ही लव्हजिहाद नाकारणाऱ्या आणि स्विकारणाऱ्यांची मानसिकता आहे. यालाही विरोध करण्याची गरज आहे.
एकंदरीत शेवटी धर्माच्या नावाने जिहाद म्हणून कोणी लग्न करत असेल तर ते रोखलेच पाहिजे. पण जाती आणि धर्माची बंधने बाजूला सारून दोन प्रेमी एकमेकांजवळ येत असतील तर त्यांना संरक्षणही दिले पाहीजे. प्रत्येकी प्रेमात व्हिलनची भुमिका घेण्यापेक्षा या प्रेमाची परिक्षा देण्याची संधी या प्रेमीजनांना दिली पाहिजे. त्यांचे प्रेम खरे की खोटे हे याची कसोटी काळ घेईलच. आणि काळाची भुमिका करण्याइतके बळ आपल्या अंगी नाही हे आजवर असंख्यवेळा सिद्ध झालेले आहे.