राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३० डिसेंबर रोजी होणार आहे, तसा अहवाल आणि परिपत्रकही संचालक मंडळांनी काढले आहे.
या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी आमदार रमेश थोरात, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, शेतकरी संघटना तसेच इतर विरोधक यांच्या भूमिकेकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. ही सभा वादळी ठरणार की संचालक मंडळ ही सभा रेटून नेणार ? याकडे लक्ष लागले आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मागील दोन वर्षी ( सन २०२० आणि २०२१ ) कोरोना महामारी मुळे ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. दोन वर्षानंतर नंतर प्रथमच सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही कारखाना स्थळावर खुल्या मैदानात आमनेसामने होणार आहे. शुक्रवारी ३० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता चाळीसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळांनी आयोजित केली आहे.
मागील सलग दोन वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑनलाइन पद्धतीने पार पडल्यामुळे अनेक सभासदांना आपली मते मांडता आली नाहीत, तर ऑनलाइन सभेत आम्हाला जाणून-बुजुन बोलू दिले नाही असा आरोप कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे,भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह इतर सभासदांनी त्यावेळी संचालक मंडळावर केला होता.
आता दोन वर्षानंतर होणाऱ्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ आणि सभासद व विरोधक आमने-सामने असणार आहेत. त्यातच मागील तीन वर्षापासून भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा बंद होता. सध्या हा कारखाना कर्नाटक च्या निराणी ग्रुपला २५ वर्षाच्या करारावर भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आल्याने यंदाचा गाळप हंगामही सुरू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या सर्वसाधारण सभेत कारखाना, कामगार, शेतकरी सभासद यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे या सर्वसाधारण सभेला संचालक मंडळाचे अर्थात कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांचे कट्टर राजकीय विरोधक रमेश थोरात हे उपस्थित राहणार का ? एरवी बंद झालेल्या भीमा पाटसच्या मुद्द्यावरून आमदार कुल यांच्या कारभारावर टीका करुन तोंडसुख घेणारे आणि तालुक्यातील राजकारण कुल यांच्या विरोधात आपल्या भाषणातून पेटवणारे दौंड चे माजी आमदार आणि कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमेश थोरात हे या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून कुल यांना आमने-सामने जाब विचारतील का ?
की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी ज्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये शब्द दिलाय तो शब्द मला पाळायचा आहे, इतरांनी त्यामध्ये लुडबुड करू नये असा इशारावजा सल्ला जिल्हा बँकेच्या निवडणूकीवेळी दिला होता, तो पाळतील? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
भीमा पाटस च्या खाजगीकरणाचा मुद्दा, कामगार व ऊस उत्पादक सभासद यांचे हितांचे प्रश्न तसेच तो भाडे तत्त्वावर देण्यासंदर्भात कायदेशीर न्यायालयीन लढा देणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे हेच एकमेव संचालक मंडळाची लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्याला आता किती सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत साथ देतात हे पहावे लागणार आहे.
ऑनलाइन सर्वसाधारण सभेत मला जाणून बुजून बोलू दिले नाही, संचालक मंडळांनी मला डावलले असल्याचा आरोप करणारे भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे हे ही आता कारखान्याच्या संचालक मंडळ व कारखान्याचे अध्यक्ष कुल यांना विविध प्रश्नांवर घेरणार का? का पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे बघ्याची भूमिका घेणार ? तसेच भीमा पाटसच्या प्रश्नांवर विविध आंदोलने करून तयार झालेले तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते हे नेमकी सभासदांची बाजू मांडणार का संचालक मंडळांच्या हो ला हो म्हणणार ? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
खऱ्या अर्थाने इतर राजकीय मंडळींपेक्षा शेतकरी संघटनेने महत्वाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासदांची आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांचे सभासद असलेले पदाधिकारी काय भूमिका घेतात हे ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, तालुक्यात कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांचे एकमेव राजकीय विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे पाहिले जाते. भीमा
मात्र पाटस कारखान्याच्या संदर्भातील त्यांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद आणि दुपटीपणाची राहिलेली आहे. माजी आमदार थोरात यांनी भीमा पाटस कारखाना प्रश्नांवर कुल यांच्यावर सातत्याने टीका जरी केली असली, तरीही थोरात यांना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून पाहिजे तेवढी ताकद दिली जात नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका नेहमीच संभ्रमात राहीली आहे.
निवडणुकीपुरते कुल यांच्या विरोधात भाषणे ठोकायची आणि इतर वेळी मात्र ते पण आपलेच आहेत? असे बोलून मोकळे होयचे? आता हे न समजण्या इतपत तरी तालुक्याची जनता खुळी नाही. त्यातच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजकेच पदाधिकारी सोडले तर इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आमदार कुल यांच्यावर राष्ट्रवादीत राजकीय विरोधक म्हणून फक्त रमेश थोरात हे एकटे पडतात.
कारण राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी नावाला राष्ट्रवादी व दुसरीकडे आमदार कुल यांचे गुणगान गायचे असे काम दौंड राष्ट्रवादीत होत असल्याचे चित्र आहे. त्याचा फटका काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात हे या सर्वसाधारण सभेत गैरहजर राहिले तर कदाचित थोरात समर्थक ही या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दोन वर्षानंतर खुल्या मैदानात संचालक मंडळ व विरोधक सभासद आमने-सामने आल्यास ही सभा निश्चितच वादळी ठरेल, मात्र थोरात यांनी या सभेकडे पाठ फिरवली, तर मग मागील काही सभांप्रमाणे ही सभा ही संचालक मंडळांसाठी एकतर्फी होऊ शकते. त्यामुळे शुक्रवारी होणारी सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा महत्वाची असल्याने ऊस उत्पादक सभासद ,कामगार तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.