मुंबई – महान्यूज लाईव्ह
तब्बल एक वर्षे २ महिने तुरुंगात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला. ते आर्थर रोड कारागृहाबाहेर येताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना तर मिठीच मारली. प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
कारागृहातून बाहेर येताच देशमुख यांच्या गळ्यात जयंत पाटील यांनी गुलाबाच्या फुलांचा हार टाकला. सचिन वाझे व परमवीस सिंह यांच्या खोट्या आरोपांमुळे मला फसविण्यात आल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटींचा आरोप केला, मात्र त्याच परमवीर सिंहांनी चांदीवाल कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले आणि मी अनिल देशमुख यांच्यावर ऐकीव माहितीवर आरोप केले, माझ्याकडे काहीच पुरावा नाही असे म्हटले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने जे निरीक्षण केले आहे, त्यामध्ये परमबीर सिंह या्ंच्या अतिशय जवळचा आरोपी सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, मला न्याय दिल्याबद्दल न्यायाधिशांचे मी आभार मानतो असे देशमुख म्हणाले, यावेळी त्यांनी सांगितले की, सचिन वाझे दोन खूनामध्ये आरोपी आहे. तीनवेळा त्याला निलंबित केले आहे. त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मुकेश अंबांनींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला म्हणून अटक केली अशा आरोपीवर विश्वास ठेवता येणार नाही असे निरीक्षण कोर्टाने केले.
अर्थात न्यायालयाने देशमुख यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली असल्याने देशमुख यांना सध्या नागपूर येथे जाता येणार नाही, आता ते शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.