दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील रोटी येथील अकरावीत शिकणाऱ्या सोमनाथ बाळू वेताळ या विद्यार्थ्याला मारहाण करून आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार व पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली. रोटी येथील सोमनाथ बाळू वेताळ ( वय १७) या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
दरम्यान, सोमनाथ यास नाना शितोळे, बंडु शितोळे, दिपाली नाना शितोळे तिघेही रा.रोटी ता.दौड जि.पुणे) व दादा ( रा.वरवंड , नक्की नाव माहित नाही ) आदींनी मुलीच्या कारणावरून हाताने लाथाबुक्याने मारहाण केली तसेच तुम्ही खालच्या जातीतील लोक आमच्या पोरीला नादी लावून आमची बदनामी करता का? असे म्हणून जिवे मारणेची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला.
या त्रासामुळे सोमनाथ आत्महत्येस प्रवृत्त झाला अशी फिर्याद सोमनाथ याची आई आशाबाई वेताळ यांनी मंगळवारी (दिनांक २७) यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातीवाचक शब्द वापरून मानसिक व शारीरिक त्रास देणे याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी ) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे अधिक तपास करत आहेत.