बारामती : महान्यूज लाईव्ह
मुंबईत हातपाय पसरलेला गोवर आता पुणे जिल्ह्यातही पोहोचला असून, आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ४ गोवर ची लागण झालेली बालके आढळली असून बारामती, मुळशी व खडकी कॅन्टोन्मेंट आदी भागात प्रत्येकी एका मुलास गोवर आढळून आला आहे.
आरोग्य विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यात चार बालके आढळली आहेत, यामध्ये एकाच गावात तीन रुग्ण आढळले आहेत. तर बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात एक, खडकी कॅन्टोन्मेंट भागातील एक व मुळशी तालुक्यातील एक बालक गोवर लागण झालेले आढळले आहे.
दरम्यान गोवर अधिक पसरू नये यासाठीच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान गोवर झालेले बालक आढळल्यास नेमक्या काय उपाययोजना करायच्या याच्याही मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत.
परिसरातील दोन किलोमीटरच्या अंतरातील घरांची तपासणी करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आला असून बाधित बालकाच्या संपर्कात कोणीही येणार नाही याची दक्षता घेण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.