बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील शिवनंदन दवाखान्यात जन्मलेले बाळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू पावल्याचा आरोप शहरातील गोपाळ गायकवाड यांनी केला असून त्यांनी या प्रकरणी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात गायकवाड यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. या निवेदनानुसार २३ डिसेंबर रोजी ही घटना घडली असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे. २२ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नीची प्रसृती झाली. मात्र पत्नीला प्रसूतीच्या कळा येत असताना डॉक्टर येथे उपस्थित नव्हते. दोन तास उशीरा प्रसूती झाल्याने बाळाचे हृदय बंद पडले. बाळाला आम्हाला पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले, तेव्हा दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबर रोजी बाळाचा मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून डॉ. तुषार गदादे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
डॉ. तुषार गदादे यांनी मात्र या प्रसूतीत हलगर्जीपणाचा आरोप नाकारला आहे. सुरवातीला प्रसूतीच्या कळा नव्हत्या, मात्र गर्भाशयाचे तोंड उघडले गेल्याने रुग्णांच्या बाबतीत सिझेरीयन शस्त्रक्रिया न करता नॉर्मल प्रसूती करणे गरजेचे असते. अशावेळी गर्भाशयाचे तोंड कडक होणे, साधारण होणे अशा क्रिया घडतात, अशावेळी नवजात अर्भकाला ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. यामध्ये शक्य ती काळजी घेतली गेली. बाळाला ऑक्सिजनची कमतरता भासली. त्याच्यावर बालरोग दवाखान्यात उपचार करण्यात आले, मात्र त्याला यश आले नाही. घडलेली घटना दुःखद आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.