दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्या टेम्पो राहू पिलानवाडी येथे ऊस तोडणी करणाऱ्यांसाठी जात असताना टेम्पो पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एका चार वर्षाचा चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर ६ जण जखमी असून तीन वर्षाची मुलगी गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव सुनिल अनिल भिल (वय ५) असे आहे. ही घटना सोमवारी (दि.२६) सकाळी नऊ वाजण्याच्या आसपास राहू येथील वाघोली रोडवर बाळोबा मंदिर परिसरातील वळणावर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे उसतोडी कामासाठी शंकर चंद्रकांत रानवडे (रा. पिंपळगाव ता. दौंड जि.पुणे) यांचेकडील उसतोड तोडणी मजुर हे सोमवारी ( दि २६) पिलाणवाडी – राहु येथे उस तोडणीस निघाले होते.
टेम्पोने (एम.एच.१२/एच.बी / २८२८) १५ ते १६ उस तोडणी मजूर घेऊन जात असताना राहु येथे धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पोचालक अनिल भिवराज भिल याचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो जागीच पलटी झाला.
टेम्पोच्या केबिनमध्ये बसलेले ईश्वर मोरे, प्रदिप ठाकरे, संदिप ठाकरे व अनिल शिवराज भिल तसेच त्याचा लहान मुलगा सुनिल भिवराज भिल बसले होते. तर टेम्पोचे पाठीमागील हौद्यात उर्वरीत उस तोडणी कामगार अंबालाल मोरे, ईश्वर भिल, रामदास ठाकरे, प्रकाश ठाकरे, प्रविण पाडवी, दशरथ मोरे, सुनिल ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह बसले होते.
टेम्पो राहु येथील बाळोबाचे मंदिराजवळुन पिंपळगाव बाजुकडुन वाघोली बाजुकडे भरधाव वेगात जात असताना वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेंम्पो हा रोडचे कडेला पलटी होवुन अपघात झाला.
या अपघातात कॅबीनमधील ईश्वर मोरे, प्रदिप ठाकरे, संदिप ठाकरे याना किरकोळ मार लागला. मात्र अनिल भिवराज भिल याचा लहान मुलगा सुनिल अनिल भिल (वय ५ ) हा डाव्या बाजूच्या दरवाज्याबाहेर पडून त्यास डोक्यास गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनिल भिवराज भिल यास डावे कानास व डावे हाताचे करंगळीस दुखापत झाली आहे. सौ. किरण सुनिल ठाकरे हिच्या उजवे पायाचे मांडीस व राधीका दशरथ मोरे ( वय ३ ) हीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघातातील जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने टेम्पोच्या खालुन बाहेर काढून पुणे येथील रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सुनिल अनिल भिल (वय ५) याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी सुरेश अंबालाल मोरे (सध्या रा.पिंपळगाव,मुळ रा.मालपुर धोंडाईचा ता. जि.धुळे सिंदखेडा) यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली. पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.