दौंड : महान्यूज लाईव्ह
छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती महादेव शिंदे, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पदस्पर्श लाभलेली, ऐतिहासिक वारसा असलेली दौंड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्या असलेल्या कसबे पाटस ग्रामपंचायतीला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.
सन १९२२ ते सन २०२२ च्या शताब्दी महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही माहिती सरपंच अवंतिका शितोळे, उपसरपंच राजेश सोनवणे, ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे यांनी दिली.
ग्रामपंचायत कसबे पाटस ही ग्रामपंचायत स्वातंत्र्यपूर्वकाळात सन १९२२ रोजी इंग्रज राजवटीत स्थापन झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून कसबे पाटस या गावाची ओळख आहे. एक ऐतिहासिक गाव म्हणून आजही प्रसिद्ध आहे. ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर याची स्थापना व मंदीराचे बांधकाम हे सरसेनापती महादजी शिंदे यांनी केले आहे.
दौंड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी नंदनवन ठरणारा आणि अनेक शेतकरी, कामगार यांची चुल पेटवणारा भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पाटसचे भूमिपुत्र सहकारमहर्षी कै. मधुकरराव शितोळे यांचे हे गाव.
दौंड तालुक्यात मोठ्या लोकसंख्येचे व मोठ्या सदस्यसंख्या असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून कसबे पाटसची ओळख आहे. सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेऊन गावगाड्यातील विकास कामांची वाटचाल सुरू आहे. उद्या पाटस ग्रामपंचायतीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
सन २०२२ च्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे मंगळवारी (दि. २७), बुधवारी व गुरुवारी या सलग तीन दिवस ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शताब्दी महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंगळवारी ( दि २७) ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सहकार महर्षी कै. मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॉमेडी तडका, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी विजेता व उपविजेतांना व इतरांना आकर्षित बक्षीस देण्यात येणार आहे.
बुधवारी (दि.२८) सकाळी दहा ते अकरा वाजता श्री. नागेश्वर मंदिरात रांगोळी स्पर्धा, दुपारी नागेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा व दुपारी चार वाजता मुलांसाठी व मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता वकृत्व स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी ( दि.२९) सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सन १९२२ ते २०२२ पर्यंतच्या सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, तसेच पाटस गावातील माजी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींचा सत्कार समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. त्यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. गावातील मुख्य रस्ता व प्रवेश द्वार या ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आली आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन केले आहे