नगर – महान्यूज लाईव्ह
राहूरीत आठ महिन्यांपूर्वी ब्राम्हणी गावात धर्मांतर करण्याचा प्रकार घडला असा आरोप विधानसभेत करून आमदार राम सातपुते यांनी प्रकरण उपस्थित केले. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यानंतर दराडे यांच्या समर्थनार्थ प्राजक्त तनपुरे यांनीही मोर्चा काढला… राज्यात एकदमच चर्चेत आलेले दराडेसाहेब कोण? त्यांचे इंदापूर कनेक्शन नेमके काय आहे? हे जाणून घेऊ
राहूरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात मूळच्या पंजाबमधील कलमसिंग या ख्रिश्चन मिशनऱ्याने एका भाजीविक्रेत्या महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचा विनयभंग केला असा आरोप आहे. यासंदर्भात महिलेने तक्रार करूनही पोलिसांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप राम सातपुते यांनी विधीमंडळात केला आहे.
दरम्यान यासंदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे व खासदार अमर साबळे यांनी नगरला येऊन मोर्चा काढला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण विधीमंडळात पोचले. राम सातपुते यांनी थेट पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावरच आक्षेप घेत पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणात गुन्हेगाराला पाठीशी घातल्याचा आरोप केला.
आरोपीने हिंदू देवदेवतांची विटंबना केल्याचा आरोप करीत पोलिस निरीक्षकावर कडक कारवाई करून महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी राम सातपुते यांनी केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी दराडे यांच्या बदलीच्या सूचना दिल्या. त्यावरून बदलीही झाली.
दरम्यान या प्रकरणानंतर राहूरीचे आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आक्रमक झाले. तसेच राहूरीतील नागरिकही संतप्त झाले. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या दराडे यांची बदली निषेधार्ह असल्याचा आरोप करीत लोक रस्त्यावर आले. त्यानंतर भाजपने तनपुरे यांच्यावर मटकावाले, मिशनरींचे पाठीराखे असा आरोप केला.
अर्थात दराडे यांनी राहूरीत केलेली कारकिर्दही लोकांच्या मते कौतुकास्पद होती. त्यांनी गुन्हेगारांना वठणीवर आणत तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. दराडे हे मूळचे इंदापूर तालुक्यातील अकोले येथील आहेत. अकोले येथील दराडे कुटुंब हे शेतकरी असून दराडे यांच्या आईवडीलांनी साखर कारखान्याचे संचालकपद भूषवले आहे.