नागपूर – महान्यूज लाईव्ह
कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्यासंदर्भातील गायरान जमीनीच्या बाबतीत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर त्याचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दूल सत्तार यांच्या वक्तव्याचा उच्चार करीत हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचे सांगत आक्रमकपणा दाखवला. त्यांची समजूत काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही याला तुम्हीही जबाबदार असल्याची टिका केली.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदापासून सत्तार हे वादग्रस्त वक्तव्ये करीत असल्याची टिका पवार यांनी केली. सत्तार हे कधी महिला खासदारांबद्दल गरळ ओकतात, तर कधी कलेक्टरलाच दारू पिता का म्हणतात..गायरान जमीन कोणालाही देता येत नाही. हा १५० कोटींचा घोटाळा आहे. पदाचा दुरूपयोग करून एका व्यक्तीला फायदा देणाऱ्या सत्तार यांचा राजीनामाच घेतला पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली.
यानंतर देवेंद्र फडणवीस हे काही सांगत असताना अजित पवार यांनी त्यांनाही सुनावले. तुमच्याकडून महाराष्ट्राला वेगळ्या अपेक्षा आहेत, मात्र मंत्र्यांच्या अशा वागण्याला तुम्हीही जबाबदार आहेत. असे वादग्रस्त मंत्री तुमच्या सरकारमध्ये आहेत आणि तुम्ही पाठराखण करता अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांना सुनावले.
त्यानंतर मात्र विरोधी बाकावरून आवाज वाढला आणि अजित पवारांचे भाषण संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला उभे राहताच विरोधकांनी भूखंड खावा कोणी गायरान खा.. अशी घोषणाबाजी केली.