सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचांची ओळख परेड घेण्यात आली. मात्र या ओळख परेड मधील राष्ट्रवादीने बहुसंख्येचा केलेला दावा भारतीय जनता पक्षाला कसलाच मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या विचाराचे 26 पैकी 15 सरपंच आल्याचा दावा केला होता तो फोल ठरला असल्याची खरमरीत टीका भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताने सरपंच आल्याच्या केलेल्या दावा वर अजूनही भाजप नाखुश असल्याचे दिसत असून आमदार दत्तात्रय भरणे यांनी दावा केलेल्या गावातील सरपंचांनी त्यांना कोलीत दिले असल्याची टीकाही जामदार यांनी केली आहे.
ॲड. जामदार यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात इंदापूर तालुक्यामध्ये 26 ग्रामपंचायतचा पंचवार्षिक निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 15 ग्रामपंचायती वरती सत्ता आल्याचा दावा परिपत्रक काढून केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा दावा गावगाड्यातील सरपंचांनी खोडून काढला आहे.
ॲड.जामदार पत्रकात म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये सरपंच निवडून आल्याचा दावा केलेल्या ग्रामपंचायती पैकी केवळ 8 ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते. तसेच दत्तात्रय भरणे यांनी परिपत्रक काढून 15 ग्रामपंचायत वरती दावा केला होता. मात्र या 15 पैकी शिरसोडी, डाळज, हिंगणगाव, पडस्थळ या गावातील सरपंच उपस्थित राहिले नाहीत.
कार्यक्रमात नवनियुक्त सरपंचांनी सहभागी व्हावे म्हणून आमदार भरणे यांनी स्वतः प्रत्येक गावच्या प्रत्येक सरपंचाला तब्बल दहा- दहा वेळा फोन केले. तरीही त्यांनी भरणे यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता भरणे यांच्या कार्यक्रमाला हजेरी न लावता उघड उघड दांडी मारली. जांब, कुरवली, म्हसोबाचीवाडी या तीन ग्रामपंचायती संमिश्र असून या ग्रामपंचायतीचे सरपंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमातही उपस्थित राहिले होते. त्यामुळे दत्तात्रय भरणे यांचा पिक्चर सर्वांच्या समोरच पडल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. यातून असे स्पष्ट दिसले की भरणे यांच्या खोट्या बोलण्याने इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व भरणे यांच्या कामाला उतरती कळा लागली आहे.
इंदापूर तालुक्यात आता भाजपची चलती आहे असे सांगत जामदार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या 26 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तब्बल 19 जागा जिंकणाऱ्या भाजप या पक्षाचे वातावरण इंदापूर तालुक्यात आहे. तसेच तालुक्यातील सुज्ञ नागरिक आणि मतदारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सार्थ विश्वास ठेवला आहे.
भविष्यात भरणे यांना इंदापूर तालुक्यातील जनता खड्यासारखी बाजूला करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अनुभवी व तालुक्याचा विकास करणाऱ्या नेत्याला स्वीकारणार आहे.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोटी-कोटी ची उड्डाणे घेणारे भरणे यांच्या कामाबाबत इंदापूर तालुक्यात प्रचंड नाराजी आहे.
इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. भरणे यांच्या काळात इंदापूर तालुक्यात झालेल्या विकास कामे निकृष्ट झाल्याने ती कामे एका वर्षातच अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात भरणे यांच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. भरणे हे केवळ तोंडापूरते गोड बोलून पाठीमागे खोड्या करणे आणि धादांतपणे खोटे बोलणे एवढेच काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भरणे यांना खोटे बोलण्याची किंमत मोजावी लागणार आहे असेही जामदार यांनी नमूद केले.