शेवटच्या फेरीला एसटी चालकाचा प्रवाशांनी केला सत्कार
घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
पुणे – भोर ते वीर अशी एसटीची फेरी नेहमीप्रमाणे सुरू होती मात्र चारोळ्यात गाडी येऊन थांबली आणि प्रवाशांनी खाली उतरून एसटीच्या चालकाचा सत्कार केला इतरांना हे वेगळे वाटले परंतु या सत्काराने चालक मात्र भारावून गेला त्याचं कारण असं की याच चालकाची ही शेवटची फेरी होती. गेली 26 वर्ष एकदाही अपघात न झालेल्या त्याच्या सेवेला ही कृतज्ञता होती!
पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील मूळ रहिवासी असलेल्या विठ्ठल शंकर शेडगे यांची राज्य परिवहन महामंडळातील सेवेची 26 वर्ष पूर्ण झाली. काल त्यांची या सेवेतील शेवटची बससेवेची फेरी भोर ते वीर या प्रवासाची होती. शेडगे हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. ही माहिती मिळताच भोर तालुक्यातील सारोळा येथील बस थांब्यावर प्रवाशांनी गाडी थांबवली आणि शेडगे यांचा सत्कार केला. या सत्काराने शेडगे भारावून गेले.
प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हा सत्कार केला. यावेळी वाहक सुहास जगताप, राजेंद्र निगडे, निकिता सोनवणे, सायली निगडे, श्वेता साळुंखे, शौकत शेख, विश्वास मालुसरे, यशवंत चव्हाण,स्वराज निगडे, अक्षय शेडगे आदी प्रवाशांनी विठ्ठल शेडगे यांचा फुल देऊन सत्कार केला.
विठ्ठल शेडगे हे परिवहन खात्यात गेली 26 वर्ष कार्यरत असून आजवर त्यांनी पंढरपूर नाशिक औरंगाबाद सोलापूर जळगाव दौंड सासवड भोर बेळगाव या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून सेवा बजावली या संपूर्ण कार्यकाळ त्यांच्याकडून एकही अपघात झाला नाही.