सांगोला -महान्यूज लाईव्ह
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत आज सांगोला येथे झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी शहाजी पाटील यांच्यासह भाजपचा समाचार घेतला. वारकरी आंदोलन ते देवेंद्र फडणवीस, संभाजी भिडे यांच्यापासून भाजपचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
शहाजी पाटील यांना त्यांनी लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, फक्त ७६८ मतांनी निवडून आलेले शहाजीबापू म्हणजे स्लो बॉल होता. पुढच्या वेळी विकेटच आहे त्यांची. हाटेल, डोंगराची क्लिप नियोजनबध्द व्हायरल केली. बापूला २०० एकर जमीन होती.. त्यातील वाट्याला ४० एकर आली असेल.. आबासाहेब ११ वेळा आमदार आले, त्यांनी किती प्रॉपर्टी जमा केली. आता बापूंकडे येऊ.. बापूंनी फक्त दोन एकरात एवढा मोठा बंगला बांधला त्यासाठी पैसे आणले कुठून? बापू म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणजे आपणच सीएम.. त्यांच्यासाठी आपण लेकरू.. पण त्यांचं वय एकनाथ शिंदेपेक्षा जास्त आहे. याच्या आधी पण शहाजीबापू पाटील यांनी विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे या साऱ्यांबद्दल अशीच वक्तव्य केली होती.
सुषमा अंधारे म्हणाल्या, बायकोला साधी २००ची साडी घ्यायला जमलं नाही. असं बापू म्हणालेत. साध्या भाषेत प्रश्न विचारते, तुमच्याकडे असे काय झाड लागले आहे की, दोन एकरात बंगला बांधला, तो पैसा कुठून आणला? बापू, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सूतगिरणी नोंदणी केली, त्याचे शेअर्स पण गोळा केले, सरकारी अनुदान जमा केले होते. ते आता कोठे आहे? बापू, ढेकर तरी देत जा हो..!
बापू, तुम्ही पंतगराव कदमांच्या नावानेही क्रेडीट सोसायटी नोंदणी केली होती. त्याचे शेअर्स कोठे गेले?तुम्ही राधाकृष्ण दूध संघ स्थापन केला, त्याचे पुढे काय झाले? कुक्कुटपालनाचे काय झाले? तुम्ही कायबी ओके केले नाही बापू अशा शब्दात त्यांनी शहाजी पाटील यांचा समाचार घेतला.
सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना पध्दतशीर साईडलाईन करण्याचा प्रयत्न केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांनाच संपविण्याचा अगदी पध्दतशीर प्रयत्न केला आहे, त्यांचाच तो ट्रॅप आहे अशी टिका त्यांनी केली.
अंधारे म्हणाल्या, देवेंद्रजींनी राजू शेट्टींना संपविण्यासाठी सदाभाऊ खोतांना वापरले. त्यांना आता साईडलाईन केले. मी सांगते, एकनाथभाऊ तुम्हाला देवेंद्रजी संपविणार हे निश्चित आहे. आता ८३ कोटींचा भूखंड १६ कोटींना कसा दिला? हा घोटाळा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत काढला आहे, मात्र तो भाजपच्याच तिघांनी बाहेर काढला आहे.
मी प्रश्न विचारायला सुरवात केली, शांतपणे विचारायला सुरवात केली. काहीच सापडेना, म्हणून पाठीमागच्या काही वर्षातील काही मिळते का हे तपासायला सुरवात केली. १३ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ मागचे पुढचे कापून एक व्हिडीओ समोर आणून वारकऱ्यांच्या विरोधात मी असल्याचे वक्तव्य केले.
भागवत संप्रदाय हा कर्मकांडाला मानणारा संप्रदाय नाही. हा संप्रदाय फक्त नामस्मरणाला व ध्यानाला महत्व दिले. मी ही वारकरी संप्रदायाशी संबंधित लेकरू आहे. मी संतमहात्म्याचे नाव घेऊन भाषणाची सुरवात करते. ज्यांनी ज्यांनी चिखलफेक केली, त्यांचे व्हिडीओ भाजपच्या आयटी सेल व मनसेच्या फेसबुक पेजवर होते.
पण माऊली, माऊली म्हणून नतमस्तक होणारा वारकरी, कधीच एखाद्या माऊलीची अंत्ययात्रा काढणार नाही. माझी अंत्ययात्रा काढणारे ते वारकरी नव्हतेच. मी जर काही चुकीचे बोलले, तर माझ्या वारकरी भागवत संप्रदायाची दहा नव्हे शंभर वेळा माफी मागेन, मात्र ही मोहन भागवत संप्रदायाची मनुवादी पिळावळ असेल, तर मी कधीच झुकणार नाही. आजच्याच दिवशी मनुस्मृतीचे दहन करून संविधानाला सुरवात केली.
मी १३ वर्षापूर्वी एक भाषण केले. त्याचा संदर्भ असा होता की, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. माझ्या आईने कोरडवाहू जमीनीत राबून फक्त एक भिंत नाही, अख्खं घर चालवलं. यात वाईट काय होतं? मी अपमान केला, असा धांडोरा देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार तुम्ही पिटता, मग सावरकरांनी काय लिहीले? सावरकर म्हणतात.. ज्ञानेश्वरांच्या पुढे रिध्दीसिध्दी पुढे असतात, ज्ञानदेव निर्जिव भिंत चालवू शकले, मात्र सजीव माणसे आपल्या बळे चालवून विध्यांद्रीच्या खिंडीत अल्लाऊद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत असे लिहीले आहे. आता या सावरकरच्या निषेधासाठी कोण पुढे येणार आहे? कोणते भक्तुल्ले पुढे येणार आहेत?
देवेंद्र फडणवीसांनी माझा राजीनामा मागावा? एकीकडे त्यांच्याच पक्षातील लोक म्हणतात की, मी तीन महिन्याचे बाळ आहे, मग तीन महिन्याच्या बाळाने एवढे नाकीनऊ आणले असेल, तर तीस वर्षे तीस वर्षे काम केलेले कार्यकर्ते काय करतील?
मी वारकऱ्याला अपमान केला, तर आंबाफेम संभाजी भिडेच काय करायचे? तुकोबा,ज्ञानोबांपेक्षा मनु श्रेष्ठ होता असे म्हणणाऱ्या संभाजी भिडे याला क्लीनचिट देणारे देवेंद्र फडणवीस आहेत. हा अपमान नाही, तुकोबांचा? ज्ञानेबांचा?