पुणे महान्यूज लाईव्ह
दिघीरोड येथील प्रियदर्शनी इंग्लीश मिडीयम शाळेत शिकणाऱ्या १५ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याने सारेच जण चक्रावले आहेत. १५ वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो या घटनेने सारेच हादरून गेले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकाने दिलेल्या त्रासामुळे मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक फिर्याद मुलाच्या आईने दिल्याने मुख्याध्यापकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भोसरीतील गव्हाणेवस्ती येथे ही घटना घडली. १५ वर्षीय शाळकरी मुलाने घरातच गळफास घेतल्याने मुलाच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांकडे फिर्याद देऊन तिने शाळेचा मुख्याध्यापक हितेश वर्मा याने शाळेत सतत त्याला मारहाण केली. शाळेचा अभ्यास वेळेवर पूर्ण करीत नाही, म्हणून त्याला शाळेतून काढून टाकतो असे तो म्हणायचा. शाळेत या मुलाला पाठवू नका असे तो सांगत असल्याने मुलाला मानसिक त्रास झाला, त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले अशी फिर्याद या मुलाच्या आईने दिल्याने पोलिसांनी हितेश वर्मा याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.