शशांक मोहिते, भाषण कला प्रशिक्षक.
तसा मी आठवड्यातून एकदा माझ्या गावी म्हणजे खडकीला ( ता.दौंड,जि.पुणे) येथे एखाददुसरा मुक्काम करण्यासाठी जातच असतो. काहींना वाटते मला आईची फार काळजी आहे.म्हणून मी एवढ्या गडबडीतून येतो.पण माझी बारामतीची बॅच असल्याने असेही मला गावी जाणे भागच असते.मी खडकीला जायला मिळावे म्हणून बारामतीची बॅच ठेवतो की बारामतीची बॅच/ कार्यक्रम करण्यासाठी मुक्कामाच्या सोईसाठी खडकीला जातो हे मलाही समजलेले नाही.
आईला आजकाल गुडघेदुखीचा,पाठदुखीचा त्रास होत असतो.मुलांच्या भवितव्याच्या काळजीने तिला निद्रानाशाचा विकार जडलेला असतो.वडीलांचे पक्षाघाताच्या धक्क्यानंतर जवळपास १० वर्षे त्यांची सेवाशुश्रुषा करण्यातच गेल्याने आईने तेव्हा स्वतःच्या प्रकृतीचा कधीच गांभीर्याने विचार केलेला नसतो.पण आता वडीलांच्या जाण्यानंतर आईने त्या काळातील दुर्लक्ष केलेल्या छोट्या मोठ्या व्याधी आता डोके बाहेर काढत असतात.त्यावेळी कुटूंबाची काळजी करताना ती आपल्या अनेक वेदनांकडे सहज दुर्लक्ष करते,अनेक दुखणी अंगावर काढते…पण आता एकटे पडल्यावर…?
आता मी कामानिमित्त पुण्या मुंबईला असताना मला खडकीहून आईचा फोन आला तर तिचे तब्बेतीचे रडगाणे ऐकावे लागेल अशी भिती वाटत राहते.पण होते उलटेच…ती स्वतः केलेल्या फोनवर माझ्या कामकाजाविषयी,तब्बेतीविषयी काळजीने चौकशी करत राहते. आता वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे.एकटीच असते.
हो, ती एकटीच असते.माझे वडील (आण्णा) तीन वर्षांपुर्वीच गेले.त्यापुर्वी आईला आण्णांची सोबत होती.आता ती स्वतःच स्वतःला कंपनी देते. खरं म्हणजे साठीनंतर आईवडीलांचे बालपण सुरु होत असते. थोड्याफार शारिरीक व्याधी सुरु होतात.काही बाबतीत त्यांना आपल्या अपत्यांवर अवलंबून रहावे लागते.
थोडक्यात अशा वयात खरं म्हणजे तिचे आरामाचे दिवस असायला पाहीजेत.पण घडतं वेगळंच. मी गावी मुक्कामासाठी गेलो की आईचा दिवस सकाळी साडेपाच सहालाच सुरु होतो.झाडलोट करते,आंघोळीचे पाणी गरम करायला ठेवते,तिच्या लाडक्या दादासाठी( भावंडांमध्ये थोरला असल्याने मी ‘दादा’) म्हणजे माझ्यासाठी चहा नाश्ता करते, मला भुक लागण्यापुर्वीच जेवण तयार करते, मग मी बारामतीला माझ्या कामासाठी निघतो.
बॅच झाल्यावर मी बारामतीच्या मित्रांमध्ये रमून गावी मुक्कामी येईपर्यंत दरवाजासमोरील ओट्यावर बसून काळजीने माझी वाट पाहत बसते.गाडी दिसली की परत लहान मुलीसारखी हसते आणि जेवण गरम करण्यासाठी किचनमध्ये जाते.मला जेवण करताना भाकरी कुस्करून हवी असेल तर तेवढ्या घाईगडबडीत ती तेही हसत हसत करून देते. त्यात काय एवढं विशेष..कारण सगळ्यांचेच आई वडील हेच तर करत असतात.म्हणजे आपल्या पोराबाळांची मुले आता लग्नाला आली तरी त्यांच्यासाठी चाळीशी किंवा पन्नाशीतील मुलेही लहान लेकरांसारखेच असतात.
गुरुदत्तचा ‘प्यासा’ हा चित्रपट पाहतानाही आपल्या ऐन उमेदीतील मुलाच्या अपयशाने,नैराश्याने चिंतीत असलेली आई पहायला मिळाली होती.म्हणजे हे चित्र प्रातिनिधीक आहे तर. आमच्या काॅलेजमधील निवृत्त उपप्राचार्य सरांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. पण तेही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या ५५ व्या वर्षातील मुलाच्या करीयरच्या काळजीने चिंताक्रांत झालेले असायचे. बाप रे…..
खडकी गावच्या शुक्रवारी असलेल्या आठवडे बाजारामध्ये काळभोर वस्तीवरुन किलोमीटरभर अंतरावरील गावात जाऊन ती स्वतःच किराणा किंवा भाजीपाला खरेदी करते. खरं म्हणजे त्यातील निम्मा बाजारहाट हा माझ्यासाठी किंवा भावंडासाठीच असतो.कारण दुसर्या दिवशी पुण्याला येताना खाऊ,डिंकाचे लाडू,चिक्की,भाजीपाला याने फुल्ल भरलेल्या पिशव्या हातामध्ये घेऊन ती बायबाय करायला गाडीजवळ येते.गाडी स्टार्ट होताना तिचा सुरकुतलेला हात माझ्या चेहर्यावरून,डोक्यावरून मायेने, काळजीने सरसर फिरवताना पुटपुटते,”‘दाद्या’ स्वतःची काळजी घे, वेळच्यावेळी गोळ्या घेत जा,जेवण करत जा. अधुनमधुन मला फोन करत जा.”
खरं म्हणजे आता मला खुप घाई असते, एखाद्या गावात/शहरात व्याख्यानाला जाण्याची…कारण शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी माझी वाट पाहत असतात. माझे आदराने स्वागत होते. मी माईकसमोर जाऊन बोलू लागतो,” मित्रांनो,आईबापाला जपा.जगात सगळे काही परत मिळू शकेल पण आईबाप मात्र परत भेटणार नाहीत.”
श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट, नंतर अनेकांसोबत सेल्फी, संयोजकांकडून मानधनाचे पाकीट घेऊन मी मोठ्या दिमाखात गाडीत बसतो. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांत आजच्या व्याख्यानाची बातमी कशी असेल, हेडलाईन काय असेल, व्याख्यानाचा फोटो फेसबूकला शेअर केल्यानंतर किती लाईक,कमेंटस येतील याचा विचार करत मी गाडीला स्टार्टर मारतो….