सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये भाजप व राष्ट्रवादीने केलेल्या वेगवेगळ्या दावे प्रतिदाव्यानंतर भाजपने सरपंचांना बोलावून सत्कार केला आणि आमचे 18 जण इंदापूर तालुक्यात निवडून आल्याचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील 12 अधिक संमिश्र म्हणजे स्थानिक आघाड्यावरती आधारित 3 असे 15 जण राष्ट्रवादीच्या विचाराचे असल्याचा दावा केला होता.
त्यामुळे नक्की कोणाचे किती सरपंच असा संभ्रम तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये देखील उपस्थित होता. आता उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. कारण भाजपने त्यांच्या 18 सरपंच असल्याच्या दाव्यानंतर सरपंचांचा सत्कार केला. आता रविवारी राष्ट्रवादीची बारी आहे.
रविवारी आमदार दत्तात्रय भरणे सकाळी नऊ वाजता इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे सरपंच समोर बोलावून इंदापूर तालुक्यातील जनतेला राष्ट्रवादीची ताकद दाखवून देतील. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सरपंचांची संख्या लक्षात आल्यानंतर भाजपच्या दाव्यातील खरेखोटेपणा देखील समोर येणार आहे. उद्या रविवारचा दिवस हा इंदापूर तालुक्यातील राजकीय दृष्टीने घडामोडीचा दिवस असणार आहे.