सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे दुचाकी लावून वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणाऱ्या वाहनावर इंदापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. काल सायंकाळी तब्बल ८८ वाहनांवर कारवाई करत त्यांना ५० हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
इंदापूर शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगवर इंदापूर पोलिसांनी गेल्या तीन चार दिवसापासून कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी २२ डिसेंबरला इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पोलिसांनी वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणाऱ्या दुचाकी जप्त केल्या. तसेच विना नंबरच्या वाहनांवर हि पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणाऱ्या दुचाकी जप्त केल्या.
रस्त्यावरती बेशिस्त वाहन पार्किंग वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनामुळे ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी ही वाढल्या होत्या.जुन्या पुणे सोलापूर महामार्गाच्या कडेला वाहने लावून नागरिक वाहतूकीला अडथळा करत होते. त्यातच काहींनी रस्त्याच्या कडेला फूटपाथ वर तसेच मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय ठरले असल्याने मोठी गर्दी दिसून येत होती.
त्यातच प्राथमिक शाळेपासून कॉलेजपर्यंत शैक्षणिक संकुल याच रस्त्यावर असल्याने शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत होते. नगरपालिकेने नोटीस देताच अतिक्रमण केलेल्या व्यवसायधारकांनी आपल्या टपऱ्या मागे घेत रस्ता मोकळा केला. पोलीस प्रशासनाच्या वाहनांवरील कारवाईमुळे नागरिक तूर्तास शिस्तीचे पालन करत असल्याचे चित्र दिसत आहे.
नुतन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस चाललेल्या कारवाईत सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार, राकेश फाळके, सचिन बोराटे, मनोज गायकवाड, अर्जुन नरळे, अमोल खाडे, सुहास आरणे, प्रविण शिंगाडे, अकबर शेख आणि विक्रम जमादार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
इंदापूर पोलिसांनी शहरात रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले असून रस्त्यावर विशिष्टपणे गाड्या लावू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन इंदापूर पोलिसांनी केले आहे.