शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहने चालवणाऱ्या नागरिकांना चांगलाच दणका दिला असून तीन महिन्यात सुमारे १३ लाख ८४ हजार इतका दंड वसूल केला आहे.
याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहरात विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबरप्लेट, नंबरप्लेटवर नाव, ट्रिपल सीट, भरधाव वेगाने वाहन चालवणे अशा वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे, शेखर झडबुके यांनी वाहतूक शाखेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
सप्टेंबर महिन्यात ५६४ वाहनांवर कारवाई करत ३ लाख ७८ हजार ९०० रुपये,ऑक्टोबर महिन्यात ६६१ वाहनांवर कारवाई करत ४ लाख ७८ हजार ५०० रुपये, नोव्हेंबर महिन्यात ५९४ वाहनांवर कारवाई करत ५ लाख २७ हजार ५०० रुपये असे एकूण तीन महिन्यात १८१९ वाहनांवर कारवाई करत सुमारे १३ लाख ८४ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे. निर्माण प्लाझा, सिटी बोरा कॉलेज रोड, बी जे कॉर्नर रोड याठिकाणी कारवाई करत ४२ वाहनांवर दंड आकारला आहे.
लहान मुलांच्या हाती मोटारसायकल देऊ नये. लहान मुलांकडे दुचाकी आढळुन आल्यास तसेच गैरवर्तन करत दुचाकी चालवून आढळून आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अंमलदार राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले.