स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनची कामगिरी
शिरूर : महान्यूज लाईव्ह
बेल्हे येथे जबरी दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हे करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या व आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे.
बेल्हे येथील सदाशिव रामभाऊ बोरटे यांच्या राहत्या घरामध्ये ६ अनोळखी दरोडेखोरांनी त्यांच्या घराचे कम्पाउंडची जाळी कट करून घराच्या हॉलच्या भितींची जाळी कट करून घरात प्रवेश केला. घरातील फिर्यादीचे नातेवाईकांना कोयता व पिस्तूलचा धाक दाखवून घरातील व अंगावरील ४९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रु. ४ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण २८ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता. त्याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके नेमण्यात आली होती. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कार्यरत होती.
स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, नेताजी गंधारे, फौजदार गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, विक्रमसिंह तापकीर, जनार्दन शेळके, सचिन घाडगे, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, संदिप वारे, अक्षय नवले,निलेश सुपेकर, अक्षय सुपे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. बडगुजर, हवालदार गायकवाड, पारखी, मालुंजे, ढोबळे यांसह पोलिस तपास करत होते.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांना पुढे होते. पोलीस पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या माहितीचे आधारे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हेगारांची माहिती प्राप्त केली व गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून नाशिक व मध्यप्रदेश येथे एकाचवेळी छापेमारी केली.
यामध्ये वासिंद ठाणे ग्रामीण येथून इर्शाद नईम शेख ( वय २८ वर्षे, रा. रो हाऊस नं. ७ संजेरी बन्हाडेमळा, पंचक जेल रोड, नाशिक रोड, नाशिक) व त्याचे वडील नईम चांद शेख(वय ५२ वर्षे) यांना ताब्यात घेतले व मध्यप्रदेश येथे धडक मारली.
मध्य प्रदेशात मोहम्मद हनीफ अल्ला बंदखान, (वय ६२ वर्षे, रा. १०८, पटेलनगर, खानराणा इंदौर), शुभम रामेश्वर मालवीय (वय २४ वर्षे, रा. गादेशहा पिपालिया, ता. जि. देवास), रहमान फजल शेख, (वय ३४ वर्षे, रा. फलॅट नं. १. पंचम अव्हेन्यू जेल रोड, राजेश्वरी मंगल कार्यालय, नाशिक),लखन बाबुलाल कुंडलिया (वय ३० वर्षे, रा. देवास रसलपूर, ता. जि. देवास) यांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आलेला आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर अशा दोन गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.
अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील सदस्यांवर यापूर्वीचे दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकुण (२०) गुन्हे दाखल आहेत. याच टोळीने दिंडोरी येथे एका कंपनीत २ गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांना आरोपींना सांगितली असून त्याबाबत अधिक तपास चालू आहे.