दौंड – महान्यूज लाईव्ह
ही कहाणी आहे.. पोलिसांची.. दौंड राज्य राखीव पोलिस दलाची.. पोलिसांच्या गणवेशाच्या पुरवठ्यात पोलिस खात्यालाच चुना लावल्याची..! या प्रकरणात दौंड पोलिसांनी मुंबईतील भोईवाडा, परेल येथील राजेंद्र शिवरामपंत पालव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राज्य राखीव पोलिस दलाच्या पाचव्या युनिटचे दौंडचे पोलिस निरीक्षक सुरेश दगडू जाधव यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली आणि दौंड पोलिसांनी पालव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
याची सविस्तर, परंतू थोडक्यात हकिकत अशी की, गेली पाच वर्षे हे प्रकरण सुरू आहे. १४ मार्च २०१७ ते १४ डिसेंबर २०२२ पर्यंत या प्रकरणाची कहाणी आहे. एसआरपीच्या दौंड येथील सन्मान गार्डसाठी आवश्यक गणवेश व त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची परवानगी शासनाने दिल्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाने पुरवठादारांकडून दरपत्रके मागवली.
या दरपत्रकात मेसर्स पालव अॅण्ड ब्रदर्स या पुरवठादारास त्याचे दर कमीत कमी असल्याने साहित्य व गणवेश पुरवठा करण्याचे टेंडर बहाल करण्यात आले. त्याच्या बिलाची रक्कम राज्य राखीव पोलिस दलाच्या पाचव्या युनिटच्या स्टेट बॅंकेतील खात्यातून धनादेशाद्वारे देण्यात आली होती.
मात्र या व्यवहारात जास्त रक्कम पुरवठादाराकडे जमा झाली. मग राज्य राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयाने ही जास्तीची रक्कम पोलिस दलाच्या दौंड येथील स्टेट बॅंकेच्या शाखेतील खात्यावर जमा करण्यासाठी पालव यांना सूचना देण्यात आली.
या व्यापाऱ्याने एक धनादेश जमा केला. मात्र तो वठला नाही. त्यासंदर्भात या व्यापाऱ्यास कळवल्यानंतर त्याने काही रक्कम स्टेट बॅंकेत आरटीजीएस केली. मात्र उरलेली रक्कम देण्यास तो टाळाटाळ करू लागला. नोटीस देऊनही त्याने ही रक्कम जमा केली नाही, त्यामुळे शासनाची फसवणूक केल्यावरून दौंड पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली.
आता याचा तपास होईल, मात्र पोलिसांनाही अधिकृतरित्या फसवण्यापर्यंत लोकांची मजल जाते. मग सामान्यांना फसवल्यानंतर ते पोलिस ठाण्यात पोचतात, तेव्हा पोलिस कर्मचारी त्यांना तुम्ही अशा लोकांशी व्यवहारच का केला असा प्रश्न विचारतात.. हा प्रश्न दौंडचे पोलिस एसआरपीला विचारतील?